NSE, BSE Holidays 2025: दिवाळीत शेअर बाजार किती दिवस बंद राहणार? यावर्षी दुपारी होणार ‘मुहूर्त ट्रेडिंग’

NSE, BSE Holidays 2025: दिवाळीचा सण जवळ येत असला तरी यावर्षी नेमकी दिवाळी कोणत्या दिवशी साजरी होणार याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. कारण अमावास्या तिथी दोन दिवसांवर पसरलेली असल्याने काही ठिकाणी 20 ऑक्टोबर तर काही ठिकाणी 21 ऑक्टोबरला दिवाळी साजरी करण्यात येणार आहे. मात्र, शेअर बाजाराच्या सुट्टीच्या यादीवरून हे स्पष्ट झाले आहे की राष्ट्रीय शेअर बाजार (NSE) आणि बॉम्बे शेअर बाजार (BSE) 20 ऑक्टोबरला नेहमीप्रमाणे खुले राहतील.
21 ऑक्टोबरला दिवाळी व लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने बाजार बंद –
एनएसईने जारी केलेल्या सुट्टीच्या यादीप्रमाणे, 21 ऑक्टोबर 2025 रोजी दिवाळी व लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने शेअर बाजार बंद राहणार आहे.
22 ऑक्टोबरलाही सुट्टी – पुढील व्यवहार 23 ऑक्टोबरपासून
याचबरोबर, दुसऱ्या दिवशी म्हणजेच 22 ऑक्टोबरला बलीप्रतिपदा निमित्तानेही बाजार बंद राहणार आहे. त्यामुळे नियमित व्यवहार पुन्हा 23 ऑक्टोबर 2025 पासून सुरू होतील.
या वर्षी दुपारी होणार ‘मुहूर्त ट्रेडिंग’ –
दरवर्षी दिवाळीच्या दिवशी ‘मुहूर्त ट्रेडिंग’ हा शुभ व्यापाराचा एक तास आयोजित केला जातो. या वर्षी तो सत्र 21 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 1.45 ते 2.45 वाजेपर्यंत पार पडणार आहे. पूर्व-उद्घाटन सत्र 1.30 ते 1.45 वाजता होईल. या काळात इक्विटी, फ्युचर्स अँड ऑप्शन्स, करंसी, कमॉडिटी डेरिव्हेटिव्ह्ज आणि सिक्युरिटीज लेंडिंग अँड बोरॉइंग (SLB) या सर्व विभागांमध्ये व्यापार करता येईल.
यावर्षी सायंकाळी नाही ‘मुहूर्त ट्रेडिंग’ –
गेल्या काही वर्षांपासून मुहूर्त ट्रेडिंग सायंकाळच्या वेळेत होत होते. मात्र, यावर्षी हे विशेष सत्र दुपारी घेण्यात येणार आहे. मागील वर्षी हे सत्र सायं. 6 ते 7 वाजेपर्यंत झाले होते.
ऑक्टोबरनंतर या वर्षात (साप्ताहिक सुट्ट्या वगळता) आणखी दोनच दिवस बाजार बंद राहणार आहेत. एनएसई आणि बीएसईने जारी केलेल्या सुट्टीच्या पूर्ण यादीत त्याची माहिती दिली आहे.
20 ऑक्टोबर: बाजार खुले राहणार
21 ऑक्टोबर: दिवाळी/लक्ष्मीपूजन – सुट्टी
22 ऑक्टोबर: बळीप्रतिपदा – सुट्टी
21 ऑक्टोबर: मुहूर्त ट्रेडिंग – दुपारी 1.45 ते 2.45
पुढील नियमित सत्र – 23 ऑक्टोबरपासून
हा शुभ मुहूर्त गुंतवणूकदारांसाठी नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीचे प्रतीक मानला जातो.





