आता श्री लक्ष्मी नरसिंह स्वामींचे घेता येणार दर्शन; बाराशे कोटी रुपयांचे मंदिर भक्तांसाठी खुलं

हैदराबाद : तब्बल बाराशे कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेले मंदिर सोमवारी भक्तांसाठी खुले करण्यात आले आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी या मंदिराचे उद्घाटन केले. श्री लक्ष्मी नरसिंह स्वामी यांचे हे मंदिर यदाद्री नावाने ओळखले जात असून गेल्या शंभर वर्षातील काळ्या दगडापासून बांधण्यात आलेले हे सर्वात मोठे मंदिर आहे.
अयोध्या येथील राम मंदिराला अकराशे कोटी रुपयांचा खर्च येणार आहे पण हे यादाद्री मंदिर बांधण्यासाठी तब्बल बाराशे कोटी रुपयांचा खर्च आला असून हे मंदिर एखाद्या राजमहालालाही लाजवेल इतके भव्य आणि आलिशान आहे. ब्लॅक ग्रॅनाईट म्हणजेच कृष्ण शीला वापरून बांधण्यात आलेले हे मंदिर वास्तुशास्त्राप्रमाणे उभारण्यात आले आहे. मंदिरासाठी तब्बल 140 किलो सोन्याचा वापर करण्यात आला असून त्यापैकी सव्वाशे किलो सोनं फक्त गाभार्यासाठी वापरण्यात आले आहे.
तेलंगणामधील यदाद्री भुवनगिरी जिल्ह्यातील नरसिंहाचे हे मंदिर एक हजार वर्षापूर्वीचे जुने होते त्याचा जीर्णोद्धार करून हे मोठे मंदिर बांधण्यात आले आहे. गाभाऱ्यामध्ये नरसिंहाची भव्य मूर्ती आहे. आंध्र प्रदेश पासून तेलंगणा वेगळा झाल्यानंतर तेलंगणा सरकारने या मंदिराचा प्रकल्प हाती घेतला त्यासाठी एका वेगळ्या प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली.
या प्राधिकरणाचे नेतृत्व खुद्द मुख्यमंत्री राव यांच्याकडेच होते. त्यांनी स्वतः लक्ष ठेवून त्या मंदिराचा प्रकल्प वेळेत पूर्ण होईल याची दक्षता घेतली. केवळ मंदिर नव्हे तर आजूबाजूचा परिसर विकसित करण्याकडे सुद्धा या प्रकल्पात लक्ष देण्यात आले आहे, तेलंगणच्या पर्यटनासाठी हे मंदिर एक मोठे आकर्षण ठरणार आहे.




