मुंबई – अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंड केलं. ते राष्ट्रवादीच्या आठ बड्या नेत्यांसह शिवसेना, भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यांनी रविवारी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी 8 नेत्यांसोबत शपथ घेतल्यानंतर शरद पवार हे पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. आम्ही महाविकास आघाडीसोबतच असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
या सर्व घडामोडींनंतर आणि राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर आज राष्ट्रवादीसाठी महत्त्वाचा दिवस आहे. आज अजित पवार आणि शरद पवार गटाकडून मुंबईमध्ये मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्यात बोलताना अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला. यावेळी अजित पवार हे शरद पवार यांच्या निवृत्तीवरही स्पष्टपणे बोलले.
ते म्हणाले की, “कॉर्पोरेटमध्ये, सरकारी नोकरीत निवृत्तीचं वय 58 असतं. अधिकाऱ्यांसाठी 60 वर्षे असतं. भाजपामध्ये 75 वर्षांनंतर निवृत्त केलं जातं. इथं 82 झालं, 83 झालं, तुम्ही निवृत्त होणार कधी? दोन मे रोजी झालेल्या बैठकीत तुम्ही राजीनामा देतो म्हणून सांगितलं. मग अचानक तो निर्णय मागे घेतला. राजीनामा मागे घ्यायचा होता तर दिला कशाला? असं देखील अजित पवार यावेळी म्हणाले.
दरम्यान, शरद पवारांचं वय काढणाऱ्या अजित पवारांना आता सुप्रिया सुळेंनी रोखठोक उत्तर दिल्याचं दिसून आलं आहे. “काही लोकांचं वय झालं त्यामुळे त्यांनी फक्त आशीर्वाद द्यावेत असं काही लोकांचं म्हणणं आहे. पण का बरं आशीर्वाद द्यावेत? रतन टाटा साहेबांपेक्षा 3 वर्षांनी मोठे आहेत. आजही टाटा ग्रुप पोटतिडकीने लढतात.
देशात टाटा ग्रुप हा सर्वात मोठा ग्रुप आहे. रतन टाटांचं वय 86आहे. सीरम इन्स्टिट्यूटचे साइरस पूनावाला यांचं वय 84, अमिताभ बच्चन 82, वॉरेन बफेट, फारूख अब्दुला साहेबांपेक्षा 3 वर्षांनी मोठे आहेत. वय हा फक्त आकडा आहे, जिद्द पाहिजे” असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.