आता हे काय नवीन ! म्हणे, आईस्क्रीममध्ये आढळला कोरोना विषाणू ; खबरदारी घेण्याचे सरकारकडून आवाहन

वुहान : मागच्या वर्षभरापासून कोरोनाच्या भीतीमध्ये संपुन जग जगात असताना लसीमुळे ही भीती काहीशी कमी होत आहे. परंतु, आता लसीकरणामुळे परिस्थिती पूर्वपदावर येत असताना चीनमध्ये आता आणखी एक नवलाची आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. चीनमध्ये आईस्क्रीममध्येही कोरोनाचे विषाणू आढळून आले आहेत. यातील ३९० डब्ब्याची विक्री करण्यात आली असून, खरेदी करणाऱ्या नागरिकांचा शोध घेतला जात आहे.

उत्तर चीनमध्ये आईस्क्रीवर करोनाचे विषाणू आढळून आले आहेत. यामुळे स्थानिक प्रशासनाची झोप उडाली असून, तातडीची पावलं उचलण्यात आली आहेत. The Daqiaodao Food Co., Ltd.या कंपनीच्या आईस्क्रीमध्ये करोनाचे विषाणू आढळून आले असून, प्रशासनाने कंपनी सील केली आहे. त्याचबरोबर कंपनीत सॅनिटायझेशन केले जात असून, कंपनीतील कार्यरत कर्मचाऱ्यांच्या कोविड चाचण्याही करण्यात आल्या आहेत.

कोरोना संक्रमित आईस्क्रीमचे २९ हजार डब्ब्यांची अद्याप विक्री झालेली नाही. फक्त ३९० डब्बेच तियानजिनमध्ये विकले गेले असल्याचं सरकारनं म्हटलं आहे. स्थानिक प्रशासनानं आता आईस्क्रीम खरेदी करणाऱ्या नागरिकांचा शोध सुरू केला आहे. त्याचबरोबर आईस्क्रीम विक्रेत्यांनाही याबद्दल सूचना देण्यात आल्या आहेत. या आईस्क्रीमध्ये न्यूझीलंडमधील दूध भूकटी आणि युक्रेनमधील दह्याची भूकटीचा समावेश केला जातो. हे पदार्थ परदेशातून मागविण्यात आल्याचं कंपनीने सांगितले असल्याचे सरकारने म्हटले आहे.

आईस्क्रीममध्ये करोनाचे विषाणू आढळून आल्यानंतर कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. १६६२ कर्मचाऱ्यांची करोना चाचणी ही करण्यात आली असून, त्यापैकी ७०० कर्मचाऱ्यांचे अहवाल करोना निगेटिव्ह आले आहेत. तर इतर कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट अद्याप आलेले नाहीत, अशी माहिती प्रशासनानं स्थानिक माध्यमांना दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.