2050 पर्यंत तब्बल वीस कोटी टन कचरा होणार निर्माण
नवी दिल्ली : सर्वात स्वच्छ ऊर्जा म्हणून सोलर ऊर्जेकडे पाहिले जाते वतावरणातील कार्बनचे प्रमाण कमी करून पर्यावरण प्रदूषणमुक्त करण्यामध्ये सौर ऊर्जेने मोठा हातभार लावला आहे. पण येत्या काही वर्षांमध्ये या सौरऊर्जेसाठी वापरण्यात येणाऱ्या सोलर पॅनलची विल्हेवाट कशी लावायची हा एक नवीन प्रश्न निर्माण होणार आहे.
2050 पर्यंत जगात सर्वत्र तब्बल वीस कोटी टन सोलर पॅनलचा कचरा तयार होणार असून मोठ्या प्रमाणावरील या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची किंवा त्याचे रिसायकलिंग कसे करायचे याचा विचार शास्त्रज्ञ आतापासूनच करू लागले आहेत. गेल्या कित्येक वर्षापासून भारतासह जगात सर्वत्र सौर ऊर्जेचा वापर सुरू झाला आहे. सौर ऊर्जेच्या उत्पादनासाठी वापरण्यात येणाऱ्या सोलर पॅनलचे आयुष्य 25 वर्षे असते. 2022 च्या अखेरपर्यंत जगात तब्बल अडीचशे कोटी सोलर पॅनल वापरण्यात येत होती सोलर पॅनलचे आयुष्य संपते तेव्हा त्याची विल्हेवाट कशी लावायची याबाबत मात्र कोणतेही नियोजन अद्याप करण्यात आलेले नाही.
सोलर पॅनल तयार करण्यासाठी विविध प्रकारचे धातू काही द्रव पदार्थ आणि काच या सर्वांचा एकत्रितपणे वापर करण्यात येत असल्याने त्याची विल्हेवाट लावणे हे मोठे आव्हान आहे. सोलर पॅनलची विल्हेवाट लावण्यापेक्षाही त्याचे रिसायकलिंग करणे शक्य आहे का याचा विचार सुरू झाला आहे. फ्रान्स सरकारने या महिन्यामध्ये आपल्या देशामध्ये सोलर पॅनलचे रिसायकलिंग करणारा कारखाना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पण जगातील सर्व सोलर पॅनल कचऱ्याची विल्हेवाट लावायची असेल तर केवळ एका देशातील एक कारखाना पुरेसा नाही याचीही तज्ञांना जाणीव आहे. त्यामुळे आगामी कालावधीमध्ये जगात इतरत्र सुद्धा अशा प्रकारचे कारखाने सुरू करावे लागणार आहेत.
सोलर पॅनलवर चांदी तांबे या धातूंचा वापर करण्यात आलेला असतो ते धातू वेगळे करून पुन्हा एकदा वापर करणे शक्य आहे का या दृष्टिकोनातूनही संशोधन सुरू करण्यात आले आहे. सोलर पॅनल मध्ये वापरण्यात येणाऱ्या प्रत्येक घटकाचेच रिसायकलिंग करता यावे या दृष्टिकोनातूनही संशोधन सुरू आहे . आयुष्य संपलेला सौरपॅनल चा वापर नवीन सोलर पॅनल तयार करण्यासाठी केला जाऊ शकत नाही ही सर्वात मोठी डोकेदुखी आहे. इंटरनॅशनल रिन्यूएबल एनर्जी असोसिएशन या संस्थेने दिलेल्या माहितीप्रमाणे 2040 पर्यंत भारत आणि इंडोनेशिया दोन देशांमध्ये सर्वात जास्त सोलर पॅनलचा कचरा निर्माण होणार आहे.