पुणे – महापालिकेकडून कोणत्याही वस्तूंची अव्वाच्या सव्वा दराने होणाऱ्या खरेदीवर चाप बसवण्यासाठी राज्यसरकारने खास पोर्टल बनवले आहे. मात्र, त्याचा आधार घेत महापालिकेने जवळपास दुप्पट दराने कागदाची खरेदी केली आहे. शिवाय यंदा कोविड सेंटरचे कारण देत 25 लाख रुपये अतिरिक्त खर्च करून जादा कागद घेतल्याचे उघड झाले आहे.
बाजारात 118 रुपयांना मिळणारी “ए 4′ साइजची पेपर रीम 236 रुपये आणि “ए 3′ पेपरी रीम 240 रुपयांऐवजी 256 रुपयांना खरेदी करण्यात आली आहे, अशी एकूण 41 हजार रीमची खरेदी करण्यात आली आहे. तर मागीलवर्षी केवळ 15 हजार 950 रीम कागद खरेदी केला होता. परंतु, यंदा कोविड रुग्णालयासाठी कागद लागत असल्याचे कारण पुढे करत तब्बल 25 हजार रीमची जादा खरेदी करण्यात आली असून, याला नुकतेच कार्यादेश देण्यात आले आहेत.
महापालिकेने खरेदी केलेला कागद इतर ऑनलाइन साइटवर कमी दराने उपलब्ध आहे. महापालिका मात्र आपण जेइएम पोर्टलच्या दराचे कारण देत चढ्या दराने केलेल्या खरेदीचे समर्थन करत असल्याची बाब समोर आली आहे.
पूर्वी महापालिका कार्यालयीन कामकाज आणि छायांकित प्रतींसाठी कागद खरेदी करत होती. महापालिकेने 2017-18 यावर्षामध्ये “ए 4′ 148 रुपये आणि “ए 3′ 182 रुपयाप्रमाणे खरेदी केले होते. 2018-19 यावर्षामध्ये “ए 4′ 161 रु. आणि “ए 3′ 198 रु. तर 2019-20 मध्ये “ए 4′ 168 रु. आणि “ए 3′ 204 रुपयाप्रमाणे खरेदी केले होते.
यावर्षी महापालिकेने 2020-21 “ए 4′ 236 रु. आणि “ए 3′ पेपर 256 रुपयाप्रमाणे खरेदी केला आहे. म्हणजे “ए 4’च्या प्रती रीम 72 रुपये आणि “ए 3’च्या दरात 52 रुपयांनी वाढ झालेली दिसते.
महापालिकेने कागद खरेदी लॉकडाऊनच्या काळात केली आहे. ऑनलाइन संकेत स्थळावरील कागद खरेदीला पोस्टेज द्यावे लागते. प्रशासनाने केलेली खरेदी ही योग्य पद्धतीनेच केली आहे.
– सुनील इंदलकर, भांडारविभाग प्रमुख, महापालिका