बॉलीवूडमध्ये सध्या बायोपिक चित्रपटांची चलती सुरू आहे. “पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आता कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या जीवनावरील चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. “माय नेम इज रागा’ असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाला लोकसभा निवडणुकीदरम्यान विरोध करण्यात आला होता. या चित्रपटाचा टिजर यापूर्वीच प्रदर्शित झाला आहे.
लोकसभा निवडणुकीमुळे प्रदर्शन लांबवलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील “पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट 24 मे रोजी प्रदर्शित झाला आहे. त्यानंतर लगेचच आता राहुल गांधींच्या जीवनावरील बायोपिक देखील लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक रुपेश पॉल यांनी केले आहे.
हा चित्रपट लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रदर्शित करण्याची दिग्दर्शकाची इच्छा होती. मात्र निवडणूक आयोगाने त्यांना परवानगी नाकारली. निवडणूक आयोगाने “पीएम नरेंद्र मोदी’ आणि ‘माय नेम इज रागा’चेही प्रदर्शन लोकसभा निवडणूक काळात रोखले होते.