मुंबई – केंद्राच्या धर्तीवर राज्यातही करोना प्रतिबंधक लसीची तयारी पूर्ण झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आता केवळ केंद्राच्या निर्णयाकडे लक्ष असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. जालना येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
राज्यातील लसीकरणाचा पहिला प्रयोग मुंबईतील केईएम रुग्णालयात केला जाणार असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले कि, वाहतूक आणि कोल्ड चेनच्या व्यवस्थेचे काम महाराष्ट्रात अत्यंत जलद गतीने सुरु आहे. आदर पूनावाला यांनीदेखील कोल्ड चेन, प्रशिक्षण आणि वाहतुकीबद्दल दिलेले टार्गेट आम्ही पूर्ण केले आहे , अशीही माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, संपूर्ण राज्यभरात करोना प्रतिबंधक लस पोहोचवण्यासाठी सर्व कामे पूर्ण झाली असून आता आम्ही केंद्र सरकार आणि औषध महानियंत्रक यांच्या परवानगीची वाट पाहत असल्याचेही राजेश टोपे यांनी सांगितले आहे. यावेळी त्यांनी रक्तदान करण्याचे आवाहनही जनतेला केले आहे.