Lalbaug Raja : आता आस पुढच्या वर्षीची! ‘लालबागच्या राजा’चे मूर्तीकार संतोष कांबळी भावुक

Lalbaug Raja : ही शान कुणाची लालबागच्या राजाची या जयघोषाने लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणूकीला सुरूवात झाली आहे. या विसर्जन मिरवणूकीत गणेश भक्तांची अलोट गर्दी पाहायला मिळत आहे. खरंतर लालबागच्या राजाची मोठी ख्याती आहे, राज्यातूनच नव्हे तर देशभरातून मोठ्या प्रमाणावर गणेश भक्त लालबागच्या राजाच्या चरणी लीन होत असतात.
लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणुकीची भव्यता डोळ्यांचं पारणं फेडणारी असते. यामुळे लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणूकीची मोठी चर्चा दरवर्षी होत असते. लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी भक्तांची डोळे पाणावले असून, मूर्तीकार संतोष कांबळी हे देखील भारावल्याचं पाहायला मिळालं.
गेल्या दहा दिवसांपासून मनोभावे पूजा आरती केल्यानंतर आज नको तो क्षण येऊन ठेपला आहे. या दहा दिवसांत लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची रीघ लागली होती. अनेक नेते, सेलिब्रिटींनी लालबागच्या राजाच्या चरणी लीन झाले. मुर्तिकार संतोष कांबळी यांनी देखील लालबागच्या राजाला अखेरचा निरोप देताना भावूक झालं आहेत. यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी आपल्या भावना व्यक्त करत असताना त्यांचा देखील कंठ दाटून आला आणि डोळे पाणावल्याचे पाहायला मिळालं. जो दिवस कुणाला नको असतो तो दिवस आज आलेला आहे. सगळ्यांची इच्छा आहे की राजाने इथून हलू नये, पण आपल्या शास्त्राप्रमाणे जसं बाप्पाचं आगमन होतं, तसं विसर्जनही गरजेचं असतं. त्यामुळे सगळ्यांना आस आता पुढच्या वर्षाची लागली आहे. आज बाप्पाचं तेज खुलून आलं आहे. हे रुप बघून मन भरून आलं आहे, अशा भावना कांबळी यांनी व्यक्त केल्या.





