आता शासकीय कंत्राटदारही जाणार संपावर ! 14 हजार कोटींची बिले थकली…

मुंबई – राज्य शासनाच्या वेगवेगळ्या विभागातील तब्बल 14 हजार कोटींची बिले थकल्याने कंत्राटदार संघटनांनी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. राज्यात विविध विभागामार्फत करण्यात आलेल्या विकासकामांची तब्बल 14 हजार कोटी रुपयांची देयके शासनाने अद्याप अदा केलेली नाहीत.
शासनाला वारंवार निवेदन देऊन देखील अद्याप निधीची तरतूद केलेली नाही. त्यामुळे 27 नोव्हेंबरपासून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा राज्य अभियंता कंत्राटदार महासंघ आणि राज्य अभियंता संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामविकास विभाग, जलसंपदा आणि जलसंधारण या विभागातील कोट्यवधी रुपयांची देयके अदा करण्यात आलेली नाहीत. यामुळे राज्यातील जवळपास 3 लाख शासकीय कंत्राटदारांना दिवाळी साजरी करता आली नाही. मागील एक ते दीड वर्षापासून हे सर्व देयके प्रलंबित आहेत.
या संदर्भत संघटनेच्यावतीने मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि संबंधित विभागाचे मंत्री यांना वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र शासनाकडून अद्याप कोणताही तोडगा न निघाल्याने 27 नोव्हेंबरपासून राज्यातील सर्व विकासकामे बंद करून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा राज्य कंत्राटदार महासंघ आणि राज्य अभियंता संघटनेचे राज्य अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी दिला आहे.
संघटनेच्या दाव्यानुसार प्रलंबित देयके
1) सार्वजनिक बांधकाम विभाग : 10 हजार 600 कोटी
2) ग्रामविकास विभाग : 2 हजार 650 कोटी
3) जलसंधारण विभाग : 650 कोटी

