Petrol Diesel Prices Hike – पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धामुळे जगरातील इंधन पुरवठा विस्कळीत झाल्याने मोठे संकट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर इंधनाचा इष्टतम वापर सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने सर्वोच्च न्यायालयाने सोमवार आणि शुक्रवारी खटल्यांची सुनावणी केवळ व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेच घेण्याचा निर्णय घेतला. तसेच, इंधनाची बचत करण्यासाठी न्यायाधीशांनी आपापसांत कार-पूलिंग अर्थात एकाच गाडीतून प्रवास करण्याची व्यवस्था राबवण्यास प्रोत्साहन देण्याचा सर्वानुमते ठराव केला. सध्याच्या संकट काळात अनावश्यक खर्चात कपात करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे. इंधन बचतीच्या उद्देशाने सर्वोच्च न्यायालयाने कामकाजात मोठे बदल करत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या नव्या व्यवस्थेनुसार सर्वोच्च न्यायालयात आठवड्यातील काही दिवसांमध्ये सुनावणी पूर्णपणे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात येणार आहे. विशेषतः सोमवार, शुक्रवार आणि इतर ठराविक दिवशी खटले ऑनलाइन पद्धतीने चालतील. याशिवाय काही आंशिक कामकाजाच्या दिवशीही सुनावणी डिजिटल माध्यमातूनच होणार आहे. या प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये यासाठी मजबूत तांत्रिक व्यवस्था उभारण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. तसेच सर्वोच्च न्यायालयातील विविध शाखा आणि विभागांतील सुमारे ५० टक्के कर्मचारी आठवड्यातून दोन दिवस घरून काम करू शकतील. मात्र उर्वरित कर्मचाऱ्यांनी कार्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक असेल, जेणेकरून न्यायालयाचे कामकाज सुरळीत सुरू राहील. घरून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी नेहमी फोनवर उपलब्ध राहणे आणि गरज पडल्यास तात्काळ कार्यालयात हजर राहणे आवश्यक असेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. कामाचा ताण जास्त असल्यास किंवा विशिष्ट विभागात घरून काम करणे योग्य नसल्यास, संबंधित अधिकाऱ्यांना या व्यवस्थेत बदल करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. हे परिपत्रक सर्वोच्च न्यायालयाचे महासचिव भरत पराशर यांनी जारी केले आहे.