प्रभात वृत्तसेवा पुणे – ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आता परकीय भाषांचे शिक्षण दिले जाणार असून, यासाठी पुणे जिल्हा परिषदेने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी करार केला आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील निवडक १०० शाळांतील शिक्षकांना जर्मन आणि फ्रेंच भाषांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. सध्या शहरातील काही खासगी शाळांमध्ये परकीय भाषा शिकवली जात असली, तरी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये अशी संधी विद्यार्थ्यांना मिळत नव्हती. त्यामुळेच परकीय भाषांचे ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. विद्यापीठाच्या परकीय भाषा विभागामार्फत शिक्षकांना १८० तासांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामध्ये शब्दसंपत्ती, उच्चार, क्रियापदांचे रूपांतर, काळ यांसारख्या बाबींवर भर दिला जाणार आहे. प्रशिक्षण ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही माध्यमांतून घेतले जाणार असून, त्यासाठी लवकरच वर्ग सुरू होणार आहेत. प्रशिक्षणादरम्यान शिक्षकांना मराठी ते जर्मन आणि फ्रेंच भाषांतील अनुवादयुक्त व्हिडिओसह पेनड्राइव्ह दिले जाणार आहे. त्यामध्ये आवश्यक अभ्यासक्रमाची माहितीही समाविष्ट असेल. या भाषा शिकवताना विद्यार्थ्यांना समजण्यायोग्य पद्धतींचा अवलंब केला जाणार आहे. प्रशिक्षणासाठी प्रतिशिक्षक दहा हजार शुल्क आकारले जाणार असून, त्यापैकी ७५ टक्के म्हणजेच रक्कम जिल्हा परिषद स्वनिधीतून उचलणार आहे. उर्वरित २५ टक्के रक्कम शिक्षकांनी भरायची आहे. अंदाजे साडेसात लाख रुपयांचा निधी जिल्हा परिषद या उपक्रमासाठी खर्च करणार आहे. प्रशिक्षणानंतर शिक्षकांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून अधिकृत प्रमाणपत्र देण्यात येईल. १५ ऑगस्टनंतर प्रशिक्षण.. साधारणतः १५ ऑगस्टनंतर प्रशिक्षणास सुरुवात होईल. विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअरच्या दृष्टीने परकीय भाषांचे ज्ञान उपयुक्त ठरेल. औद्योगिक क्षेत्रात, तसेच परदेशी नोकऱ्यांच्या संधींसाठी याचे मोठे महत्त्व आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी दिली.