मुंबई : लाडक्या बहिणींच्या खात्यावर नोव्हेंबर महिन्याचे १५०० रूपये अद्याप जमा झालेले नाहीत. राज्यात कोणत्याही क्षणी महापालिका निवडणुका लागू शकतात. त्यामुळे महायुती सरकारकडून नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्याचे ३००० रूपये लाडक्या बहिणींच्या खात्यावर टाकले जाऊ शकतात. नोव्हेंबर महिन्याचे १५०० रूपये ७ डिसेंबरपर्यंत खात्यावर येतील, असा अंदाज वर्तवला जात होता. पण अद्याप या हप्त्याबाबत सरकारकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. राज्यात १५ डिसेंबरनंतर २९ महापालिका निवडणुकीचा धुरळा उडण्याची शक्यता आहे. त्याआधी सरकारकडून लाडक्या बहिणींच्या खात्यावर दोन महिन्यांचा हप्ता ३००० रूपये एकत्रित जमा केला जाऊ शकतो. याचा फायदा महापालिका निवडणुकीत होण्यासाठी सरकारकडून ही खेळी केली जात आहे. ज्या महिलांनी ई केवायसी केलेली आहे, त्यांच्या खात्यात पैसे जमा होतील. ३० डिसेंबरपर्यंत राज्यातील लाडक्या बहिणींना ईकेवायसी पूर्ण करायची आहे. नोव्हेंबर महिन्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात १७ वा हप्ता येणार होता. पण आठवडा उलटला पण अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.