कराडमधील कुख्यात गुंड अभिनंदन झेंडे स्थानबद्ध

सातारा – कराड शहर व परिसरात अनेक गुन्हे करणारा गुंड अभिनंदन रतन झेंडे (रा. शाहू चौक, शनिवार पेठ, कराड) याला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचा आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिला. खुनाचा प्रयत्न, साधी व गंभीर दुखापत, शिवीगाळ, दमदाटी करणे, बेकायदेशीर जमाव जमवून दहशत निर्माण करणे, मालमत्तेचे नुकसान करणे, सार्वजनिक शांतता भंग करणे, बेकायदेशीर शस्त्रे बाळगणे, सरकारी नोकरास मारहाण करणे, खंडणी मागणे, चोऱ्या, जबरी चोऱ्या, हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन करणे, असे अनेक गुन्हे झेंडेने साथीदारांच्या मदतीने कराड परिसरात केले आहेत.
अनेकदा सुधारण्याची संधी देऊनही त्याच्या वर्तनात सुधारणा होत नसल्याने पोलिसांनी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवायादेखील केल्या होत्या. या सगळ्यांचा झेंडे याच्यावर काहीच परिणाम झाला नाही. त्याच्या गुन्हेगारी कारवाया सुरुच होत्या. त्यामुळे झेंडेच्या स्थानबद्धतेचा प्रस्ताव कराड शहर पोलिसांनी पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे पाठवला होता.
हा प्रस्ताव शेख यांनी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्याकडे पाठवला. त्यावर सुनावणी होऊन झेंडेला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचा आदेश जयवंशी यांनी दिला. त्यानंतर झेंडेची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, पोलीस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील, गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, भगवान पाटील, सपोनि अमित बाबर, अंमलदार अमित सपकाळ, नितीन येवळे, विनोद माने, प्रफुल्ल गाडे यांनी ही कारवाई केली.





