प्रभात वृत्तसेवा पुणे – कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात १७ चितळ मृत्यूमुखी पडल्याची घटना नुकतीच घडली होती. ओडिशा येथील प्रयोगशाळेच्या अहवालानुसार या चितळांचा मृत्यू लाळ खुरकत या विषाणूजन्य आजारामुळे झाल्याचे समोर आले आहे. या घटनेची गंभीर दखल महापालिका आयुक्तांनी घेतली असून, या प्रकरणात त्यांनी मुख्य उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे, प्राणीसंग्रहालयाचे संचालक डॉ. राजकुमार जाधव यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ही नोटीस अतिरिक्त महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिली असून, या प्रकरणाचा येत्या चार दिवसांत खुलासा देण्याचे आदेश या नोटिशीद्वारे देण्यात आले आहेत. राजीव गांधी प्राणी संग्रहालयात ७ ते १६ जुलै दरम्यान १७ चितळांचा मृत्यू झाला. मृत चितळांच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी राज्यातील आणि भारतभरातील विविध शासकीय संस्था, प्रयोगशाळांकडे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी भुवनेश्वर येथील प्रयोगशाळेच्या प्राप्त अहवालानुसार प्राण्यांची लक्षणे आणि प्रयोगशाळा तपासणी अहवाल जुळल्याने लाळ खुरकत या विषाणूजन्य आजाराचे संक्रमण झाल्याचे निदान झाले आहे. या पार्श्वभूमीवर संग्रहालयातील प्राण्यांची काळजी व्यवस्थित घेतली जाते का? कामात कुचराई होते का, असे विविध प्रश्न या नोटिशीद्वारे उपस्थित केले असून, या सगळ्याचा खुलासा मागवला आहे. अधीक्षक घोरपडे आणि संचालक डॉ. जाधव यांनी नोटिशीला चार दिवसांत उत्तर द्यायचे आहे. यात प्राणी संग्रहालय अधिकारी आणि कर्मचारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे दिवटे यांनी सांगितले. क्रांतीसिंह नानासाहेब पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ आणि विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळा, पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन येथील तज्ञांच्या चमूने मृत प्राण्यांचे शवविच्छेदन करून जैविक नमुने गोळा केले होते. हे नमुने राष्ट्रीय लाळ खुरकत संशोधन केंद्र, भुवनेश्वर (ओरिसा), भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्था, बरेली, विभागीय वन्यजीव संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, नागपूर आणि राष्ट्रीय उच्च सुरक्षा प्राणी रोग शाळा, भोपाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.