कॅन्टोमेंटच्या बैठकीत विविध प्रस्तावांना मान्यता देहूरोड – देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीत सहा वेगवेगळ्या ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया करण्याच्या प्रस्तावास तर अनधिकृत 24 बांधकामधारकांना नोटीस बजाविण्यासंदर्भात सभेत मान्यता देण्यात आली. तसेच कोविडकाळात काम केलेल्या सर्व वैद्यकीय अधिकारी, संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सभेत अभिनंदन करण्यात आले. कॅन्टोन्मेंट बोर्डाची सर्वसाधारण सभा गुरुवारी (दि. 29) दुपारी बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर संजय खन्ना यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपाध्यक्ष रघुवीर शेलार, मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल, नायब तहसीलदार विजयकुमार चोबे, नगरसेवक हाजिमलंग मारीमुत्तू, गोपाळराव तंतरपाळे, विशाल खंडेलवाल, ललित बालघरे, सारिका नाईकनवरे, मेजर एस माणिकवेल, कार्यालय अधीक्षक राजन सावंत, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता जोशी या वेळी उपस्थित होते. केंद्र शासनाच्या विधवा पेन्शन योजना, ज्येष्ठ नागरिक योजना, राष्ट्रीय कुटुंब योजना आदी कल्याणकारी योजना कॅन्टोन्मेंट हद्दीत राबविण्याबाबत मुख्य कार्यकारी हरितवाल यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिनिधी नायब तहसीलदार विजयकुमार चोबे यांच्या निदर्शनास आणले. योजनांची अंमलबजावणी करण्याबाबत शिबिराचे आयोजन मध्यवर्ती ठिकाणी करण्याबाबत सूचित केले. त्यानुसार शेलार व बालघरे यांनी विविध वॉर्डांत शिबिर घेण्याबाबत प्रस्ताव मांडला. कॅन्टोन्मेंट रुग्णालयातील निवासी वैद्यकीय अधिकारी एक पद व सहायक वैद्यकीय अधिकारी असे दोन पदे रिक्त असल्याने संबंधित पदांची कायमस्वरूपी भरती प्रक्रिया सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. आरोग्य विभागाचे कार्यालय रुग्णालयाच्या आवारात सुरू करण्याची मागणी नगरसेवक मारीमुत्तू यांनी केली. तर खंडेलवाल यांनी रुग्णालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कामांबाबत तक्रार केली. व्यापार संकुलातील रिकामे गाळे व बोर्डाच्या आवारातील कॅन्टीन इमारतीचे भाडे कमी करण्याची मागणी सदस्य बालघरे यांनी केली. बोर्ड सदस्य मारीमुत्तू यांच्या मागणीनुसार आमदार सुनील शेळके यांच्या स्थानिक विकास निधीतून वॉर्ड क्रमांक 3 मध्ये सार्वजनिक शौचालय बांधकामासाठी ना हरकत पत्र देण्यास, चिंचोली येथे गटारीचे सुधारणा व दुरुस्ती करण्यास तर देहूरोड येथील रस्त्याची दुरुस्ती व सुधारणा कामास सभेत मान्यता देण्यात आली. हद्दीतील चार इमारत बांधकामांस सभेत मान्यता देण्यात आली. अनधिकृत बांधकामे ही एका रात्रीत होतात ? कॅन्टोन्मेंट प्रशासनाच्या हद्दीत होणारी अनधिकृत बांधकामे ही एका रात्रीत होत नाहीत. त्याकडे संबंधित अभियंता व अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे सुनावत ब्रिगेडीअर अध्यक्ष संजय खन्ना यांनी संबंधितांची कानउघाडणी केली.