हिंदी कलर्स वाहिनीला केंद्रीय प्रसारण मंत्रालयाची नोटीस

‘राम सिया के लव-कुश’ मालिकेत तथ्यांची मोडतोड केल्याचा वाल्मिकी समाजाचा आरोप

मुंबई : हिंदी कलर्स वाहिनीला केंद्रीय प्रसारण मंत्रालयाने नोटीस पाठवली आहे. ‘राम सिया के लव-कुश’ ही हिंदी कलर्स वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या मालिकेत तथ्यांची मोडतोड केल्याप्रकरणी मंत्रालयाने वाहिनीला नोटीस बजावली असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच येत्या 15 दिवसांत आपली बाजू मांडण्यासाठी मंत्रालयात हजर होण्याचे आदेश दिले आहेत.

‘राम सिया के लव-कुश’ या मालिकेत भगवान वाल्मिकींबाबत चुकीचे चित्रण करण्यात आल्याचा आरोप पंजाबमधील वाल्मिकी समाजाने केला आहे. त्यामुळे या मालिकेचे प्रसारण बंद करावे अन्यथा पंजाबमध्ये बंद पुकारण्याचा इशारा समाजाच्यावतीने सरकारला देण्यात आला होता. या विरोधानंतर पंजाबमधील काही भागांत या मालिकेचे प्रसारण बंद करण्यात आले होते. दरम्यान, पंजाब आणि हरयाणाच्या हायकोर्टाने ‘राम सिया के लव-कुश’ या मालिकेवर बंदी घालता येणार नाही असे सरकारला सांगितले होते. वाल्मिकी समाजाने या मालिकेवर आरोप करताना म्हटले आहे की, या मालिकेत भगवान वाल्मिकींबाबत चुकीची माहिती दाखवण्यात येत आहे त्यामुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. याचा निषेध करण्यासाठी वाल्मिकी समाजाने पंजाबच्या फाजिल्का शहरात मोर्चा काढून सर्व दुकाने बंद करण्याचे आवाहन केले होते. दरम्यान, काही दुकानदारांशी मोर्चेकरांची बाचाबाची देखील झाली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.