– रंगनाथ कोकणे वारंवार येणार्या वादळांचे कारण म्हणजे मानवाकडून निसर्गाच्या अंदाधुंद शोषणामुळे होणारे हवामान बदल होय. नासाने इशारा दिला की, पुढे चक्रीवादळे अधिक धोकादायक बनतील. यंदाचे वर्ष हे ज्या विविध कारणांमुळे गाजणार आहे किंवा त्याची नोंद इतिहासात होणार आहे, त्यामध्ये चक्रीवादळांचा समावेश अग्रस्थानी करावा लागणार आहे. अलीकडेच ‘मेलिसा’ या महाभयंकर चक्रीवादळाने कॅरिबियन देश जमैकासह अन्य देशांमध्ये हाहाकार उडवला. या वादळाचा वेग ताशी 282 किलोमीटर इतका असल्याचे समोर आले आहे. यूएस नॅशनल हरिकेन सेंटर (एनएचसी)च्या म्हणण्यानुसार, 2005 मध्ये प्वेर्टो रिकोमध्ये आलेल्या ‘कॅटरिना’ आणि 2017 मध्ये न्यू ऑर्लीन्समध्ये आलेल्या ‘मारिया’पेक्षा मेलिसा जास्त धोकादायक होते. अवघ्या 24 तासांतच ते पाचव्या श्रेणीचे चक्रीवादळ बनले. श्रेेणी 5 ही चक्रीवादळाची सर्वात धोकादायक श्रेणी मानली जाते. 2025 मध्ये आतापर्यंत या प्रकारची पाच चक्रीवादळे नोंदवली गेली आहेत. यामध्ये ‘रागासा’ या फिलीपाइन्समध्ये आलेल्या चक्रीवादळाचा वेग ताशी 262 किमी इतका होता; तर अमेरिकेतील एरीन चक्रीवादळाचा 260, ऑस्ट्रेलियात आलेल्या एरोलचा 260 किमी, बर्मुडावर आलेल्या हमबर्टोचा 241 किमी इतका वेग होता. दुसरीकडे, यादरम्यान आंध्रप्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगाल या तीन राज्यांवर ‘मोंथा’ या चक्रीवादळामुळे आलेली नवी नैसर्गिक आपत्ती आपण नुकतीच पाहिली. बंगालच्या उपसागरात सतत मोठ्या लाटा आणि वादळी प्रवाह निर्माण होत असतात. यामागचे प्रमुख कारण म्हणजे या उपसागराची ट्रॅपिझोडियल स्थिती हे असून ती वायुमंडलीय हालचालींना एकाच ठिकाणी केंद्रित करते. बंगालच्या उपसागराचं तापमान अरबी समुद्रापेक्षा जास्त असतं, म्हणून इथं वादळं जास्त बनतात. अलीकडच्या काळात हवामान बदलांमुळे भारताच्या पश्चिम किनार्यावर म्हणजेच अरबी समुद्रातही वारंवार आणि अधिक शक्तिशाली चक्रीवादळं तयार होऊ लागली आहेत. स्टॉर्म म्हणजे वातावरणातील एक प्रकारचा अस्थिरपणा जो प्रामुख्याने वेगवान वार्यांच्या स्वरूपात दिसून येतो आणि त्याच्यासोबत पाऊस, बर्ङ्ग किंवा गारांचा वर्षाव होतो. जेव्हा असे वादळ जमिनीवर तयार होतात, तेव्हा त्यांना सामान्य वादळ म्हटले जाते. परंतु जेव्हा हे वादळ समुद्रातून उठतात, तेव्हा त्यांना हरिकेन म्हणतात. हरिकेन हे सामान्य वादळांपेक्षा अधिक प्रचंड आणि धोकादायक असतात. हरिकेन, सायक्लोन आणि टायङ्गून हे तिन्ही एकाच प्रकारच्या वातावरणीय घटनेची वेगवेगळी रूपेे आहेत. ङ्गक्त प्रदेशानुसार त्यांची नावं बदलतात. उदाहरणार्थ, उत्तर अमेरिका आणि कॅरिबियन बेटांमध्ये तयार होणार्या समुद्री वादळांना हरिकेन म्हणतात. ङ्गिलिपाइन्स, जपान आणि चीन या प्रदेशांमध्ये येणार्या समुद्री वादळांना टायङ्गून म्हणतात; तर ऑस्ट्रेलिया आणि हिंदी महासागर म्हणजेच भारताच्या आसपासच्या प्रदेशात तयार होणार्या समुद्री वादळांना सायक्लोन म्हटले जाते. अटलांटिक महासागर आणि उत्तर पश्चिम पॅसिङ्गिक महासागर येथे तयार होणार्या वादळांना हरिकेन म्हणतात. उत्तर पश्चिम प्रशांत महासागरात तयार होणार्या वादळांना टायङ्गून म्हणतात, तर दक्षिण प्रशांत महासागर तसेच हिंद महासागरात तयार होणार्या वादळांना सायक्लोन म्हटले जाते. भारताच्या आसपास येणार्या समुद्री वादळांना सामान्यतः सायक्लोन असे नाव दिले जाते. टॉर्नेडो हे देखील अतिशय वेगवान आणि धोकादायक वादळ असते; परंतु ते सायक्लोन नसतात, कारण टॉर्नेडो बहुतेक वेळा जमिनीवरच तयार होतात. जगात सर्वाधिक टॉर्नेडो अमेरिकेत आढळतात. गतवर्षी मे महिन्यात आलेल्या रामल चक्रीवादळाचा वेग ताशी 110 किलोमीटर होता. त्यानंतर ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये ‘आसना’ वादळाने बंगालच्या उपसागरात खळबळ उडवून दिली होती. दानाने ऑक्टोबरमध्ये कहर केला होता. चक्रीवादळांमुळे होणारे नुकसान हे प्रचंड मोठे असण्याची भीती असते. गतवर्षी देशात विविध चक्रीवादळांमुळे 278 लोकांचा मृत्यू झाला होता आणि सुमारे 5,334 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याची नोंद झाली. जीवित व वित्तहानीचा हा आकडा प्रत्यक्षात अधिक असू शकतो. आभाळ एकदम भरून येणे, सोबत विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट होऊन पाऊस सुरू होणे ही या वादळाची लक्षणे होत. ही वादळे समुद्रात निर्माण होत असल्याने वार्याचा तडाखा समुद्र किनार्याजवळच्या प्रदेशाला प्रामुख्याने बसतो. आभाळ भरून आल्याने हवाई वाहतूक आणि समुद्रात लाटा उसळल्याने जलवाहतूक बंद पडते. काही वेळा जहाजे उलटतात, बुडतात. वादळ आणि पूर ही संकटे कमी झाल्यावर पुनर्वसनाचे प्रश्न निर्माण होतात. चक्रीवादळांदरम्यान अतिवृष्टीमुळे निर्माण होणारे दलदलीचे क्षेत्र, जोरदार वादळामुळे नष्ट होणारी नैसर्गिक जंगले आणि हिरवळ, प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासाची पडझड यामुळे संपूर्ण निसर्गाचा समतोल बिघडून जातो. सोसाट्याच्या वार्यांमुळे किनारी भागात खारे पाणी लोकवस्त्यांमध्ये शिरते. तसेच शेतजमिनीवर चिखल व दलदल निर्माण होते. या नुकसानीची दुरुस्ती करणे अवघड ठरते. ‘इंटरगव्हर्नमेंटल ग्रुप ऑन क्लायमेट चेंज’च्या अहवालानुसार, 1970 पासून हरितगृह वायू उत्सर्जनामुळे निर्माण होणारी 90 टक्के अतिरिक्त उष्णता जगातील महासागरांनी शोषून घेतली आहे. त्यामुळे महासागरांचे तापमान कमालीचे वाढत आहे. याचाच परिणाम म्हणजे गेल्या तीन-चार दशकांमध्ये चक्रीवादळे अधिकाधिक धोकादायक बनत चालली आहेत. समुद्राचे तापमान 0.1 अंशाने वाढले म्हणजे चक्रीवादळाला अतिरिक्त ऊर्जा मिळते. चक्रीवादळांमध्ये काही वेळा अनेक अणुबॉम्बइतकी ऊर्जा निर्माण करण्याची क्षमता असते. चक्रीवादळांची निर्मिती ही थेट पृथ्वीच्या स्वतःच्या अक्षाभोवती ङ्गिरण्याशी संबंधित आहे. विषुववृत्ताजवळील समुद्रात जेथे पाण्याचे तापमान 26 अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक असेल तेथे अशी चक्रीवादळे निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. तीव्र सूर्यप्रकाशामुळे जेव्हा समुद्रावरील हवा तप्त होते, तेव्हा ती वेगाने वरच्या दिशेला जाते. अशा रीतीने वर जाताना हवेचा वेग वाढला की ती खूप वेगाने ङ्गिरते आणि एक मोठे वर्तुळ बनते. हे वर्तुळ काहीवेळा 2 हजार किमीच्या त्रिज्येपर्यंत विस्तारू शकते. नासाने केलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान अंदाजे 28 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होते तेव्हा तीव्र वादळे येतात. ‘जिओङ्गिजिकल रिसर्च लेटर्स’ (फेब्रुवारी, 2019) मध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात असे म्हटले आहे की समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानात प्रत्येक एक अंश सेल्सिअस वाढीमुळे चक्रवादळांची संख्या 21 टक्क्यांनी वाढते. मागील दशकात अशा चक्रीवादळांमुळे देशात सुमारे 20.4 दशलक्ष लोक प्रभावित झाले असून 51.5 अब्ज डॉलरहून अधिक नुकसान झाले आहे. हवामान बदलामुळे उष्णकटिबंधीय महासागरांच्या तापमानात वाढ झाल्यामुळे चालू शतकाच्या अखेरीस तीव्र पाऊस आणि वादळांचे प्रमाण वाढू शकते.