नोंद : महाराष्ट्र पर्यटनात मागे का?
महाराष्ट्राला इतिहास, निसर्ग, संस्कृती आणि जैवविविधतेचे वरदान (Maharashtra Tourism) लाभलेले आहे. मात्र, नियोजनाचा अभाव, दृष्टीहीन धोरणांमुळे हा अमूल्य वारसा अजूनही अपेक्षित आर्थिक व सामाजिक मूल्य निर्माण करू शकलेला नाही.

– सत्यसाई पी एम
Maharashtra Tourism : महाराष्ट्राला इतिहास, निसर्ग, संस्कृती आणि जैवविविधतेचे वरदान (Maharashtra Tourism) लाभलेले आहे. मात्र, नियोजनाचा अभाव, दृष्टीहीन धोरणांमुळे हा अमूल्य वारसा अजूनही अपेक्षित आर्थिक व सामाजिक मूल्य निर्माण करू शकलेला नाही.
इतिहास, निसर्ग, सांस्कृतिक वैभव, समुद्रकिनारे, जैवविविधता, धार्मिक परंपरा आणि आधुनिक महानगरांचा संगम लाभलेले महाराष्ट्र राज्य पर्यटनाच्या दृष्टीने भारतातील अग्रगण्य राज्य असायला हवे होते; परंतु प्रत्यक्षात पर्यटन क्षेत्रात (Maharashtra Tourism) राजस्थान, केरळ, गुजरात, गोवा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि अगदी ईशान्येकडील काही राज्यांनीही महाराष्ट्रापेक्षा अधिक ठळक पर्यटन ओळख निर्माण केली आहे. प्रश्न पर्यटनसंपत्तीचा नाही; प्रश्न आहे तो धोरणात्मक दृष्टिकोनाचा, अंमलबजावणीचा आणि पर्यटनाकडे उद्योग म्हणून पाहण्याच्या मानसिकतेचा.
पर्यटन क्षेत्रातील महाराष्ट्राची पहिली आणि सर्वांत मोठी उणीव म्हणजे एकात्मिक पर्यटन धोरणाचा अभाव. पर्यटनाचा विचार अजूनही स्वतंत्र आर्थिक क्षेत्र म्हणून न करता तो सार्वजनिक बांधकाम, वन, पुरातत्व, स्थानिक स्वराज्य संस्था, महसूल, सांस्कृतिक कार्य, परिवहन आणि पर्यटन विभाग अशा अनेक विभागांमध्ये विखुरलेला आहे.
परिणामी, एखाद्या पर्यटनस्थळाचा विकास करताना समन्वयाचा अभाव प्रकर्षाने जाणवतो. रस्ते एका विभागाकडे, स्मारक दुसर्याकडे, स्वच्छता तिसर्याकडे व विपणन चौथ्याकडे अशी विभागणी झाल्यामुळे एकात्मिक अनुभव निर्माण होत नाही.
दुसरी गंभीर समस्या म्हणजे ‘ब्रँड महाराष्ट्र’ची अनुपस्थिती. पर्यटन क्षेत्रात प्रतिमा (ब्रँड आयडेंटिटी) अत्यंत महत्त्वाची असते. केरळने ‘गॉडस् ओन कंट्री’, गुजरातने ‘खुशबु गुजरात की’, मध्य प्रदेशने ‘द हर्ट ऑफ इनक्रेडिबल इंडिया’ आणि राजस्थानने राजेशाही वारशावर आधारित ब्रँड तयार केला. महाराष्ट्राकडे शिवकालीन इतिहास, सह्याद्री, कोकण, मुंबई, बॉलीवूड, संतपरंपरा, जागतिक वारसा स्थळे, जैवविविधता अशी अनेक बलस्थाने असूनही या सर्वांना जोडणारी एकात्मिक पर्यटन प्रतिमा आजही निर्माण झालेली नाही.
तिसरी समस्या म्हणजे पर्यटनाचे (Maharashtra Tourism) मार्केटिंग अत्यंत मर्यादित राहिले आहे. आजचा पर्यटक पर्यटन कार्यालयात जाऊन माहिती घेत नाही; तो मोबाइलवरील डिजिटल माध्यमांवर निर्णय घेतो. कृत्रिम बुद्धिमत्ता, सोशल मीडिया, व्हर्च्युअल टूर, ड्रोन व्हिडिओ, प्रभावी संकेतस्थळे, बहुभाषिक माहिती, डिजिटल नकाशे आणि ऑनलाइन आरक्षण ही आधुनिक पर्यटनाची मूलभूत साधने झाली आहेत. महाराष्ट्रातील अनेक पर्यटनस्थळांची माहिती अद्याप तुटक, कालबाह्य किंवा अपुरी आहे. अनेक लपलेली पर्यटनस्थळे तर अधिकृत संकेतस्थळांवरही प्रभावीपणे नोंदलेली नाहीत.
चौथी उणीव म्हणजे पर्यटनस्थळांवरील मूलभूत सुविधांचा अभाव. स्वच्छतागृहे, सुरक्षित पार्किंग, प्रशिक्षित मार्गदर्शक, माहिती केंद्रे, आपत्कालीन वैद्यकीय सेवा, दिव्यांगांसाठी सुविधा, डिजिटल पेमेंट, सार्वजनिक वाहतूक, स्थानिक दिशादर्शक फलक, कचरा व्यवस्थापन अशा मूलभूत गोष्टी अनेक ठिकाणी समाधानकारक नाहीत. एखादे पर्यटनस्थळ सुंदर असले तरी पर्यटकाचा अनुभव असुविधाजनक असेल तर तो पुन्हा त्या ठिकाणी येत नाही. याहून गंभीर बाब म्हणजे वारसा संवर्धनातील उदासीनता.
महाराष्ट्रातील अनेक ऐतिहासिक किल्ले, मंदिरे, वाडे, लेणी आणि पुरातत्त्वीय स्थळे नैसर्गिक झीज, अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे, भित्तीचित्रांचे नुकसान, प्लॅस्टिक प्रदूषण आणि अपुर्या देखभालीमुळे धोक्यात आहेत. पर्यटन विकासात स्थानिक समाजाचा अपुरा सहभाग हीदेखील मोठी उणीव आहे. जगभरातील यशस्वी पर्यटन मॉडेलमध्ये स्थानिक नागरिक हेच पर्यटनाचे प्रमुख भागीदार असतात.
केरळमध्ये ‘रिस्पॉन्सिबल टुरिझम’ मॉडेल, सिक्कीममध्ये समुदाय-आधारित पर्यटन, राजस्थानमध्ये लोककला आणि हस्तकला, हिमाचलमध्ये होमस्टे संकल्पना या माध्यमातून स्थानिक अर्थव्यवस्था बळकट झाली. महाराष्ट्रात काही ठिकाणी होमस्टे वा ग्रामीण पर्यटनाचे प्रयोग झाले असले, तरी त्यांचा विस्तार मर्यादित राहिला.
ग्रामीण पर्यटन हे महाराष्ट्रासाठी सुवर्णसंधी ठरू शकते. राज्यातील हजारो गावे स्थानिक खाद्यसंस्कृती, शेती, लोककला, आदिवासी परंपरा, जलव्यवस्था, जैवविविधता आणि पारंपरिक जीवनशैली यामुळे पर्यटकांना आकर्षित करू शकतात. परंतु ग्रामीण पर्यटनासाठी आवश्यक प्रशिक्षण, आर्थिक सहाय्य, डिजिटल विपणन आणि गुणवत्तेची मानके यांचा अभाव आहे.
‘चित्रपट पर्यटन’ हे आणखी एक दुर्लक्षित क्षेत्र आहे. मुंबई ही भारतीय चित्रपटसृष्टीची राजधानी असूनही राज्याने चित्रपट पर्यटनाचा पुरेसा वापर केलेला नाही. जगातील अनेक देशांनी लोकप्रिय चित्रपटांचे चित्रीकरण झालेल्या स्थळांना स्वतंत्र पर्यटन (Maharashtra Tourism) केंद्र म्हणून विकसित केले आहे. महाराष्ट्रातही अनेक ऐतिहासिक किल्ले, समुद्रकिनारे, सह्याद्री, मुंबईचा वारसा आणि कोकणातील निसर्ग यांचा या दृष्टीने उपयोग होऊ शकतो.
याचप्रमाणे कृषी पर्यटन, वाइन पर्यटन, खाद्य पर्यटन, साहसी पर्यटन, वैद्यकीय पर्यटन, परिषद पर्यटन (एमआयसीई पर्यटन) आणि आध्यात्मिक पर्यटन यांमध्ये महाराष्ट्राला प्रचंड क्षमता आहे. नाशिकचे द्राक्षमळे, कोल्हापूरची खाद्यपरंपरा, विदर्भातील संत्रा पट्टा, कोकणातील आंबा-काजू शेती, पुणे-मुंबईची वैद्यकीय सुविधा आणि मुंबईचे जागतिक व्यावसायिक महत्त्व यांचा एकात्मिक वापर अद्याप अपेक्षित प्रमाणात झालेला नाही.
पर्यटन हा केवळ मनोरंजनाचा विषय नसून रोजगारनिर्मिती, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना आणि ग्रामीण विकासाचे प्रभावी साधन आहे. त्यामुळे महाराष्ट्राने पर्यटनाला उद्योग म्हणून मान्यता देत दीर्घकालीन धोरण, पायाभूत सुविधा, कौशल्य विकास आणि सर्व संबंधित विभागांचा समन्वय असलेले एकात्मिक पर्यटन प्रशासन विकसित करणे आवश्यक आहे.






