– जगदीश काळे भेसळयुक्त दुधामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यावर उपाय म्हणून दुधात भेसळ करणार्यांवर नियंत्रण मिळविणे गरजेचे असून दुधाचा पौष्टिकपणा जपणे आवश्यक आहे. भारतात धवलक्रांतीचे जनक अर्थात ङ्गादर ऑङ्ग व्हाइट रिव्होल्यूशन पद्मविभूषण डॉ. वर्गिस कुरियन यांची जयंती 26 नोव्हेंबर रोजी ‘राष्ट्रीय दुग्धदिन’ म्हणून साजरी केली जाते. जागतिक अन्न पुरस्कार आणि मॅगेसेसे सन्मानित डॉ. कुरियन हे जगातील सर्वात मोठा दुग्धोत्पादन कार्यक्रम बिलीयन लीटर आयडिया (ऑपरेशन फ्लड) साठी ओळखले जातात. भारत हा दुग्धोत्पादनात आघाडीचा देश असताना त्यातील भेसळ हा देखील चिंतेचा विषय ठरत आहे. साहजिकच या कुरापतीमुळे लहान बाळांना पुरेशाप्रमाणात पौष्टिकपणा मिळत नाही आणि त्यांच्या अशक्तपणात भर पडत जाते. त्याचवेळी सरकारकडून दुधातील भेसळीला लगाम घालण्यासाठी प्रयत्न केले जात असले तरी ते कमीच पडत आहेत. भारतात दुधाचा वापर अधिक प्रमाणात केला जातो. दुधाबरोबरच संलग्न पदार्थांचे उत्पादनही विपुल प्रमाणात केले जाते. अर्थात त्याची पौष्टिकता आणि दर्जा यावरून बरेच प्रश्न उपस्थित केले जातात आणि या गोष्टी सार्वजनिक आरोग्य आणि ग्राहकांच्या विश्वासाला कदाचित धक्का देणार्या आहेत. प्रामुख्याने दुधाचे प्रमाण वाढविण्यासाठी भेसळ केली जाते आणि ती गुणवत्ता चाचणीत सहजपणे धुळङ्गेक करते. ती सहजासहजी ओळखू येत नाही. ही भेसळ इतकी बेमालुमपणे केली जाते की त्यात भेसळ झाल्याचेदेखील कळत नाही. पाणी, स्टार्च, डिटर्जंट, युरिया, कास्टिक सोडा, माल्ट्रोडेक्सट्रिन एवढेच नाही तर आरोग्याला अपायकारक असलेले रासायनिक पदार्थांचे मिश्रण दुधात केले जाते. चरबीचे प्रमाण वाढविणारे काही घटक दुधात मिसळले जातात. दुधात मिसळण्यात येणारे ङ्गॉर्मेलिन, हायड्रोजन पॅराक्साइड हे कर्करोगाला पोषक मानले जातात. किंवा यकृत आणि मूत्रपिंडांसारख्या अवयवांवर विपरित परिणाम करतात. भेसळीचा अनैतिक बाजार हा ङ्गायद्यासाठी होत असताना तो केवळ नैसर्गिक पोषणासाठी आवश्यक असलेल्या घटकांचे प्रमाण कमी करत नाही, तर ग्राहकांच्या आरोग्याला आणि आयुष्याला देखील संकटात टाकतो. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एङ्गएसएसएआय) ने राज्यसभेत तीन वर्षांत उत्पादित केलेल्या दुग्धोत्पानाशी संबंधित आकडेवारी जारी केली. या अहवालानुसार, भेसळयुक्त दुधाचे प्रकार उत्तर प्रदेशात सर्वाधिक घडतात असे म्हटले आहे. यापाठोपाठ राजस्थान, तमिळनाडू आणि चौथ्या क्रमाकांवर केरळचे नाव आहे. या अहवालातील आकडेवारी धक्कादायक आणि आश्चर्यकारक आहे. उत्तर प्रदेशात भेसळ करणार्यांवर कारवाई देखील केली गेली. यानुसार 1928 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तामिळनाडूत 944, केरळमध्ये 737, महाराष्ट्रात 191, बिहारमध्ये 174 गुन्हे दाखल केले. गेल्या पाच वर्षांत उत्तर प्रदेशातील अनेक शहरांत दूध भेसळीचे प्रकार उघडकीस आले. अमोनिया, युरियामुळे दुधाची चव बदलते आणि ती पूर्ववत करण्यासाठी स्टार्चचे मिश्रण केले जाते. या कृतीमुळे भेसळ झाल्याचा थांगपत्ता लागत नाही. विशेष म्हणजे कोणतीही अवजड मशीन न वापरता आणि प्रयोगशाळेत चाचणी न करता दुधात भेसळ केली जाते तरी अशा भेसळयुक्त दुधाची ओळख पटविणे तज्ज्ञांना देखील कठीण ठरते. राष्ट्रीय दूध सुरक्षा आणि गुणवत्ता सर्वेक्षण 2018 ने हायड्रोजन पॅराऑक्साइड, युरिया आणि डिटर्जेंटमिश्रीत दूध हे मानवी आरोग्याला अपायकारक असल्याचे म्हटले आहे. एका आकडेवारीनुसार, भारतात दुधाची विक्री ही उत्पादनाच्या तुलनेत अधिक होत असल्याचे निदर्शनास आले आहे. याचाच अर्थ भेसळयुक्त दुधाची सर्रास विक्री होत असल्याचे स्पष्ट होते. भारतात 2013-14 मध्ये 14.63 कोटी टन दुधाचे उत्पादन झाले आणि ते आज 23.06 कोटी टनवर पोचले आहे. यात सहा टक्के वाढीचा दर गृहित धरलेला असताना त्याचवेळी जागतिक वाढीचा दर दोन टक्के राहिला आहे. देशात दुग्धोत्पादनाचे 68 टक्के क्षेत्र असंघटित असल्याने ते संघटित करणे आणि उत्पादनाला चालना देण्याचे प्रयत्न सरकारी पातळीवर केले जात आहे. सध्या देशात डेअरी उत्पादनाचे मूल्य 11.16 लाख कोटी रुपये आहे. केंद्रीय पशुपालन आणि दुग्धोत्पादन मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात दुभत्या जनावरांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. म्हशींची संख्या 10.8 कोटींवरून 11 कोटींवर पोचली आहे. गाईंची संख्या 19.09 कोटींवरून 19.30 कोटींवर पोचली आहे. पशुपालन आणि डेअरी उद्योगातून 12 कोटींपेक्षा अधिक लोकांना रोजगार मिळाला आहे. भारतासह अमेरिका, युरोपसारख्या अनेक देशांनी दुधातील भेसळ रोखण्यासाठी कडक कायदे केले आहेत. चीनमध्ये तर ङ्गाशीच्या शिक्षेची तरतूद आहे. भारतासारख्या देशात कायद्यातून पळवाटा शोधल्या जातात. भेसळयुक्त दुधामुळे लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.