– डॉ. डी. एस. काटे सध्या राजकारणात रेवडी संस्कृतीची चलती आहे. सरकार विविध गोष्टी फुकट वाटत आहेत. अगदी पैसेही फुकट वाटत आहेत. मात्र, त्याबदल्यात ते तुमचे मत विकत घेतात. त्यामुळे फुकट काहीही मिळत नाही, हेच खरे. निवडणुकीच्या काळात विविध राजकीय पक्षांकडून जाहीर केल्या जाणार्या मोफत योजना, त्याचबरोबर घोषणा यामुळे लोकशाहीमध्ये मतदानाकडे डोळा ठेवून ही कृती केली जाते व मतदारास आकर्षित केले जाते. अशाप्रकारे प्रसिद्धीसाठी व जनतेची मतदानरूपी सहानुभूती मिळवण्यासाठी अनेक योजना व अनुदानाची रक्कम ठराविक वर्गास मदत करते. अनेकदा अशा वर्गाच्या नावावर मोठमोठी रक्कम, त्याचबरोबर अनुदान अनेक राजकीय पुढारी व अधिकारी पद्धतशीरपणे लाटतात व सरकारी योजनांचा फायदाही घेतात. फक्त गरिबांच्या नावावर त्याचं मार्केटिंग होतं. अर्थात खतावणी होते. बाकी हातात काहीच येत नाही? असे अनुभव अत्यंत ताजे आहेत. त्यातली त्यात कृषी अनुदान, शेतकर्यांसाठी पीक विमा आणि शेतकर्यांसाठी आपत्कालीन मदत याच्यामध्ये सर्वात जास्त अफरातफर होते. अशा योजनांची अंमलबजावणी करताना देशाचे अर्थात राज्याचे आर्थिक गणित बिघडले जाते. विकास आणि मदत याची गफलत होऊन आर्थिक मंदीच्या खाईमध्ये अनेक राज्ये जातात. त्याचबरोबर कर्जाचासुद्धा डोंगर वाढत जातो. ह्या योजनांना कुणी फुकट योजना, कोणी चकटफू योजना, निःशुल्क अर्थात विनामूल्य मदत म्हणून संबोधतात. चकटफू हा ग्रामीण भागातील एकदम रुळलेला शब्द असायचा. कुठे काही जेवण फुकट असले, कोणाकडे काही मोफत वस्तूंची वाटप असली, लग्नकार्य समारंभ यात फुकट प्रवास असला तर अशा मोफत प्रकारास ‘चकटफू’ म्हणून संबोधले जायचे. रेवड्यावरच्या कुस्त्या ग्रामीण भागामध्ये प्रसिद्ध असायच्या. यात्रेनिमित्त किंवा काही समारंभानिमित्त ग्रामीण भागामध्ये प्रत्येक गावामध्ये कुस्त्यांचा हगामा प्रत्येक वर्षी होत असे. या कुस्त्यांदरम्यान लहान पैलवान, शिकाऊ पैलवान, त्याचबरोबर लहान मुले यांची कुस्ती लावली जात असे. या कुस्तीत विजयी होणार्या किंवा कुस्ती बरोबरीत सुटणार्या दोघाही खेळाडूंना रेवडी दिली जायची. कोणतेही शुल्क अर्थात पैसा त्यांना दिला जात नसायचा. सगळ्यात शेवटी मोठ्या पैलवानाची कुस्ती झाल्यानंतर बक्षीस व मानधन म्हणून त्यास रोख रक्कम दिली जायची. ज्या ज्या व्यक्तीस रेवड्या दिल्या जायच्या त्याला हलके म्हणून हिणवण्यासाठी ‘रेवड्यावरील पहिलवान’ असे संबोधले जायचे. जेणेकरून त्याची प्रतवारी लोक करत. अशिक्षित, कमी मानधनांमध्ये काम करणार्यालासुद्धा ‘रेवड्यावरील पैलवान’ लोक सहज म्हणत. पूर्वी रेवडी पारंपरिक पद्धतीने गूळ, साखर, तीळ, थोडासा मैदा किंवा पीठ, तूप, तेल यांचा पदार्थ करून वेगवेगळ्या आकारात बनवली जायची. ती थोडी चिकट असल्यामुळे व त्यातील घटकामुळे खाण्यासही पौष्टिक वाटे व भुकेलाही आधार मिळायचा. त्यामुळे गरिबांचे खाद्य म्हणून रेवडी सर्वत्र प्रसिद्ध असे. शिवाय तिचा बनवण्याचा खर्चही कमी असल्याने व सहज उपलब्ध असल्यामुळे बर्याच दिवस टिकाऊ राहिल्याने सर्वत्र प्रसिद्ध असे. मग कमी खर्च करण्यासाठी कार्यक्रमामधून लहान मुलांना व कधी इतर माणसांना रेवडी वाटप करण्याची प्रथा सुरू झाली. तेही अल्प खर्चात… पुढे या अनुषंगाने सरकारी मदत संस्थेकडून आणि देवस्थानाकडून मिळणारी मदत यास ‘रेवडी संस्कृती’ म्हणून संबोधले जाऊ लागले. आज रेवडी संस्कृती भारतीय लोकशाहीमध्ये रुजत गेलेली आहे. लोकशाहीला लागते ते स्थान टिकवण्यासाठी बहुमत आणि बहुमतासाठी जनता आणि जनतेला खूश करण्यासाठी सरकारी योजना/अनुदान ही साखळी तयार झाली. मग मतदारास भरघोस आश्वासनं, फुकट योजनाची मदत, अन्नधान्य तेल त्याचबरोबर काही वर्गास वेगवेगळे गोंडस नाव देऊन रोख रक्कम अशा योजना राबवल्या जातात. आज आर्थिकदृष्ट्या तत्त्वतः या योजनांचा वापर ज्या राज्यांनी केला त्यांची परिस्थिती ढासळलेली आहे. असे असताना सवंग प्रसिद्धीसाठी सरकार अशा योजना राबवते. यामुळे एकंदरीत देशाचा विकास खुंटतो. अशा वर्गास स्वातंत्र्यापासून आतापर्यंत विकास प्रवाहामध्ये आणता न आल्याने ह्या वर्गांची संख्या वाढत आहे. सरकार यासाठी शाश्वतपणे अजून कुठलीही योजना आणून गरीब वर्गास विकसित करू शकले नाही, अर्थसंपन्न करू शकले नाही ही खरी शोकांतिका आहे. परजीवी त्याचबरोबर दुसर्यावर विसंबून, अवलंबून राहणारा समाज आपण निर्मित तर करत नाहीत ना हाही प्रश्न पडतो. रेवडी संस्कृतीमुळे शेती, उद्योग या क्षेत्रात आज लोकांची काम करण्याची इच्छा होत नाही. त्यामुळे श्रम करण्याची ताकद कमी होते. एकंदरीत असा समाज, असा वर्ग जर देशात वाढत गेला तर देशाची प्रगती खुंटते. त्याचबरोबर उत्पादित व विकासात्मक योजनांना खीळ बसते. आपण असा परावलंबी वर्ग तर तयार करत नाही ना! याचे भान ठेवावे. ‘There is no such thing as a free lunch’ ही इंग्रजीमधील म्हण आहे. याचा सरळ अर्थ असा होतो की, जगामध्ये फुकट, मोफत असं काही नसतं. जेव्हा ते आपल्या हातात फुकट किंवा मोफत म्हणून येतं, त्याला निर्मित करण्यासाठी भांडवल/श्रम आणि निसर्ग संसाधन यातूनच ते निर्मित होते. म्हणजेच आपल्या हातात जी वस्तू येते, ती कुणी ना कोणी बनवलेली असते. त्यासाठी कष्ट हे लागतातच… मग ती फुकट कशी? फक्त तिचे दाम चुकते करणारे वेगळे हात असतात.