– प्रा. डॉ. गजानन र. एकबोटे संत तुकाराम महाराजांनी विचारलेला प्रश्न, ऐसे कैसे झाले भोंदू? आजही तितकाच महत्त्वाचा आहे. त्याचे उत्तर शोधताना समाजाने विवेक, विज्ञान, प्रबोधन आणि सत्यनिष्ठ कृतीच्या मार्गावर ठामपणे चालण्याचा निर्धार करणे गरजेचे. आज महाराष्ट्र अशोक खरात (Ashok Kharat) या स्वयंघोषित भोंदूबाबाच्या घोटाळ्यांमुळे हादरलेला आहे. दैवी शक्ती असल्याचा दावा करणार्या या व्यक्तीची फसवणुकीची कुरूप आणि दुष्ट कहाणी आता उघड झाली आहे. लोकांचे भविष्य सांगण्याच्या नावाखाली त्याने असंख्य लोकांची, महिलांची फसवणूक केली. त्याहूनही गंभीर म्हणजे अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. या आरोपांना पुष्टी देणारे व्हिडिओही समोर आले आहेत. या घटनेमुळे आपल्यासमोर एक गंभीर प्रश्न उभा राहतो- समाजात असे किती भोंदू मोकाट फिरत आहेत आणि किती निरपराध लोक त्यांच्या जाळ्यात अडकलेले आहेत? संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात प्रश्न विचारला होता- ऐसे कैसे झाले भोंदू? त्यांच्या काळातही त्यांनी धर्माच्या आड लपलेल्या ढोंगीपणावर कठोर शब्दांत टीका केली होती. त्यांचे हे विचार आज अधिकच प्रभावी वाटतात. Ashok Kharat Case विज्ञान, शिक्षण आणि माहितीच्या युगात राहूनही समाजातील मोठा वर्ग अजूनही अशा भोंदू बाबांच्या प्रभावाखाली जात आहे. अशोक खरात प्रकरण हे अशाच फसवणुकीच्या परंपरेतील आणखी एक काळा अध्याय आहे. स्वतःला ‘कॅप्टन’ म्हणवून घेणार्या आणि दैवी शक्ती असल्याचा दावा करणार्या या भोंदूने केवळ सामान्य नागरिकांनाच नव्हे, तर राज्यातील अनेक प्रभावशाली राजकारण्यांनाही फसवले. अशी फसवणूक यशस्वी होणे म्हणजे आपल्या सामूहिक बौद्धिक दिवाळखोरीचे आणि अंधश्रद्धेचे द्योतक आहे. भोंदूबुवा माणसाच्या कमकुवतपणाचा आणि निराशेचा फायदा घेतात. त्यांचे गिर्हाईक बहुतेक वेळा गरीब, अशिक्षित आणि अडचणीत सापडलेले लोक असतात. आजारपण, बेरोजगारी किंवा कौटुंबिक तणावामुळे माणूस खचला की हे भोंदू लोक ‘चमत्कार’ दाखवण्याचे खोटे आश्वासन देतात. सुरुवातीला ते छोटे, निरुपद्रवी भाकीत करून विश्वास संपादन करतात आणि नंतर त्या विश्वासाचा गैरफायदा घेतात. काहींनी अशा भाबड्या लोकांच्या जोरावर मोठमोठे आश्रम उभारून प्रचंड संपत्ती मिळवली आहे. जेव्हा सुशिक्षित लोक आणि राजकारणी लोक अशा भोंदूंच्या पाया पडतात, तेव्हा सर्वांना प्रश्न पडतो- समाज नेमका कुठे चाललाय? अनेक वेळा अशा घटना समोर आल्या आहेत जिथे महिलांचे तथाकथित तांत्रिक विधी, अंधश्रद्धा किंवा उपचारांच्या नावाखाली लैंगिक शोषण झाले आहे. अशोक खरात प्रकरण हे त्याचेच ताजे उदाहरण आहे. अशा घटना नैतिकता आणि विवेकबुद्धीच्या मुळावरच घाव घालतात. ‘विधी’ किंवा ‘संकट निवारण’ या नावाखाली महिलांचा छळ केला जातो. हे भोंदू लोक गुप्त खजिना, मानवी बळी किंवा विचित्र तांत्रिक प्रथांचे उपाय दाखवतात. जी भक्ती वाटते, ते प्रत्यक्षात वासना आणि लोभाचा विकृत खेळ असतो. ही समाजाची अधोगती थांबविणे ही आजची तातडीची गरज आहे. महाराष्ट्र ही संत, विचारवंत आणि समाजसुधारकांची भूमी आहे. महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत तुकाराम महाराज, सर्व संत, गोपाळ गणेश आगरकर इत्यादी यांनी विवेक, समता आणि प्रबोधनाचा मार्ग दाखवला. परंतु आज त्यांच्या शिकवणी विसरल्या गेल्यासारख्या वाटतात. डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि इतर समाजसुधारकांनी आणि इतर कार्यकर्त्यांनी अंधश्रद्धेविरुद्ध समाजाला जागृत करण्यासाठी आपले आयुष्य वाहिले. त्यांचा लढा केवळ कायद्यात बदल घडवण्यासाठी नव्हता, तर लोकांच्या विचारसरणीत बदल घडवण्यासाठी, अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी होता. तो लढा अजूनही अपूर्ण आहे, आज त्या लढ्याची अधिक गरज आहे. खरं तर माणसाने विश्वास ठेवावा तो स्वत:च्या कर्मावर, रिकाम्या आणि अनावश्यक विधींवर नाही. आयुष्यातील अडचणींवर मात करण्याचा मार्ग म्हणजे कठोर परिश्रम, शिक्षण आणि योग्य विचार. कोणताही चमत्कार किंवा कोणत्याही स्वयंघोषित भोंदूबुवांचे आशीर्वाद आयुष्य बदलू शकत नाहीत. समाजाने अशा भोंदूंविरुद्ध सतर्क राहिले पाहिजे. जेव्हा कोणी दैवी शक्ती असल्याचा दावा करतो, तेव्हा अंधश्रद्धेला बळी न पडता त्यास प्रश्न विचारणे, विवेक वापरणे आणि कायद्याचा आधार घेणे आवश्यक आहे. शिक्षण, वैज्ञानिक दृष्टिकोन, प्रबोधन, जागरूकता आणि शासनाची इच्छाशक्ती यांच्या माध्यमातूनच समाज या जाळ्यातून मुक्त होऊ शकतो. अशा भोंदूबुवांविरूद्ध शासनाने अतिशय कठोर धोरण अवलंबिले पाहिजे. ग्रामीण भागात आणि अशिक्षित समाजात अशा भोंदूबाबांचे फार मोठे प्रस्थ आहे. त्यांनी अनेक महिलांचे नुसतेच लैंगिक शोषण नाहीतर कोट्यवधी रुपयांचे आर्थिक शोषण केले आहे. आपल्या राज्यातील थोर संतांनी सामाजिक समरसता निर्माण केली. परंतु ही समरसता, सामाजिक शांतता नष्ट करण्याचे काम हे सर्व भोंदूबाबा करतात. थोर संतांनी निर्माण केलेले भक्तीचे तत्त्वज्ञान नष्ट करण्याचे समाजद्रोही आणि देशद्रोही काम हे भोंदूबाबा करीत आहेत. पुण्यातही असा एक भोंदूबाबा होऊन गेला. त्याने एका तरुण मुलीवर व तिच्या लहान बाळावर केलेले अमानुष अत्याचार अजूनही लोकांच्या आठवणीत आहेत. अशा सर्व भोंदूबाबांवर शासनाने कठोर कारवाई केली पाहिजे. याबाबतीत गृहखाते, पोलीस, शिक्षणतज्ज्ञ, समाजसुधारक यांच्याकडून मोठ्या प्रमाणात कामगिरी अपेक्षित आहेत. अशा भोंदूबाबांना पाठीशी घालणार्या राजकारणी लोकांना सर्वच पक्षांनी खड्यासारखे बाजूला काढायला हवे. त्यांचे राजकीय भवितव्य संपुष्टात आणले पाहिजे.