दखल : हिमालयातील भूकंपाचा इशारा

– नरेंद्र क्षीरसागर
तिबेटमध्ये अलीकडेच झालेल्या शक्तिशाली भूकंपाने हिमालय क्षेत्रात चिंता वाढली आहे. दीर्घकाळापासून या भागात भूकंपाचे धक्के बसलेले नव्हते. या स्थितीला ‘सेस्मिक गॅप’ असे म्हणतात.
नव्या वर्षाच्या पहिल्या आठवड्यात तिबेटच्या शिगात्से क्षेत्रात सुमारे सात रिश्टर स्केल एवढ्या तीव्रतेचा भूकंप झाला. त्याचे धक्के उत्तर भारत आणि हिमालयीन राज्याला जाणवले. हा भूकंप या भागाला एकप्रकारे इशारा देणारा आहे. कारण, हिमालयीन राज्य हे भूकंपाच्या संवेदनशीलच्या दृष्टिकोनातून पाच-चारमध्ये मोडतात आणि तो सर्वाधिक संवेदनशील क्षेत्र म्हणून ओळखला जातो.
भूगर्भशास्त्राच्या शास्त्रज्ञांनी दिलेल्या इशार्यानुसार, गेल्या शंभर वर्षांत या भागात 8 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसलेला नाही. त्यामुळे पृथ्वीत खूप प्रमाणात भूगर्भीय ऊर्जा निर्माण झालेली असू शकते. या ऊर्जेतील घट देखील धोकादायक स्थितीतून बाहेर पडू शकते. भूकंपाला थांबवता येत नाही. मात्र सजगता आणि जागरूकतेने सुरक्षा निश्चित करता येऊ शकते.
राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या संकेतस्थळावर 8 जानेवारीच्या दिवशी सिक्कीममध्ये 2.8 पासून 4.9 रिश्टर स्केलचे सुमारे 24 भूकंपांची नोंद झाली. सात जानेवारी रोजी तेवढेच भूकंप सिक्कीममध्ये नोंदले गेले. यावर्षी 1 जानेवारी ते 8 जानेवारीपर्यंत मणिपूर, हिमाचल प्रदेशचा डोडा, मध्य प्रदेशातील सिंगरौली आणि गुजरातच्या कच्छ भागात डझनभर भूगर्भीय हालचाली नोंदल्या गेल्या.
लोकसभेत 6 डिसेंबर 2023 रोजी पृथ्वी विज्ञान मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर भारत आणि नेपाळमध्ये येणार्या भूकंपांची संख्या सातत्याने वाढत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे नेपाळमध्ये अल्मोडा फॉल्ट सक्रिय होणे. भारताचा हिमालय परिसर हा आपल्या भूगर्भीय रचनेवरून संवेदनशीलरित्या भूकंपप्रवण राहिला आहे. हिमालय भाग हा भूभर्गीयशास्त्राच्या दृष्टिकोनातून पृथ्वीवरील सर्वाधिक संवेदनशील भागांपैकी एक आहे.
हिमालय हा सर्वात नाजूक आणि संवेदनशील पर्वत मानला जातो. हा भाग युरेशिया आणि भारतीय प्लेट यांच्यात स्थिरावलेला आहे. जेव्हा दोन्ही प्लेट एकमेकाला धडकतात तेव्हा ती धडक भूकंप होण्यास कारणीभूत ठरते किंवा त्यापैकी एक कारण मानता येते. भूगर्भीय इतिहासानुसार भारतीय उपखंड हा मूळ रूपाने एक बेट होता आणि तो 50 दशलक्ष वर्षांपूर्वी आशियाला धडकला आणि या प्रक्रियेत हिमालयाची निर्मिती झाली.
या धडकेमुळे पृथ्वीच्या पृष्टभागावार तीव्र दबाव आणि ताण निर्माण झाला आणि तो अजूनही भूकंपाला कारणीभूत ठरतो. भारतीय आणि युरेशिया प्लेटची सतत धडक होत राहते आणि परिणामी व्यापक प्रमाणात भूगर्भीय ऊर्जा निर्माण होते. याप्रमाणे अचानक भूकंपाचे धक्के पृथ्वीच्या पृष्ठभागावर जाणवू लागतात. हिमालय भाग हा उंच ठिकाणी असून तेथील जमिनीवर सतत बदल होत राहतो.
भूकंपाचे धक्के या पर्वतरांगांतील रचनेत उलथापालथ घडवून आणतात. पर्वतीय भागात खाण उत्खनन, जलविद्युत प्रकल्प आणि अन्य बांधकामाच्या योजनांमुळे भूंकपाची शक्यता अधिकच बळावते. या घडामोडीमुळे जमिनीच्या पोटात दबाव वाढतो आणि त्यामुळे भूकंपाचे धक्के जाणवू लागतात. उत्तराखंड आणि हिमालयाच्या भागात गेल्या शंभर वर्षांत मोठा भूकंप झालेला नाही.
हिमालय भागात शेवटचा मोठा भूकंप (8 रिश्टर स्केल) 1934 मध्ये (नेपाळ, बिहार) आणि 1950 मध्ये आसाममध्ये झाला होता. या स्थितीला सेस्मिक गॅप असे म्हणतात. या गॅपमुळे व्यापक प्रमाणात भूगर्भीय ऊर्जा जमा हेात राहते. ही ऊर्जा बराच काळ दबून राहिल्याने भविष्यात मोठा भूकंप होण्याची शक्यता असते. ऐतिहासिक दृष्टिकोनातून पाहिले तर 1803 मध्ये गढवालमध्ये भूकंप झाला.
त्याची तीव्रता 7.5 रिश्टर स्केलपेक्षा अधिक होती. त्यामुळे मोठा हाहाकार माजला. त्यानंतर प्रचंड दुष्काळही पडला. 1905 मध्ये कांगडा येथे भूकंप झाला. त्याची तीव्रता 7.8 रिश्टर स्केल होती. त्यामुळेही हिमालय भागात हाहाकार उडाला. 1950 मध्ये आसाम, तिबेटमध्ये झालेल्या भूकंपाची तीव्रता 8.6 रिश्टर स्केल होती. हा हिमालयात नोंदला गेलेला सर्वात मोठा भूकंप होता.
मात्र उत्तराखंड यापासून वाचला. उत्तराखंडचा गढवाल आणि कुमाऊं भाग हा शंभर वर्षापासून मोठ्या भूकंपााच्या धक्क्यापासून सुरक्षित राहिले आहेत. भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते, सेस्मिक गॅपमुळे भूगर्भीय ऊर्जा जमा झाली असून ती एकाचवेळी बाहेर आली तर ती विध्वंसकारी ठरू शकते. परिणामी भूकंपविरोधी तंत्रज्ञानाचा वापर करूत आणि आपत्ती व्यवस्थापनाची तयारी ही अत्यंत महत्त्वाची झाली आहे.
भारत सरकारने भारतीय मानक (निकष) 1893 सारखे बांधकामातील निकषांना लागू केले असून ते भूकंपविरोधी व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल मानले जाईल. याशिवाय विविध शास्त्रीय शोधाच्या माध्यमातून भूकंपाच्या संभाव्य शक्यतेचा अंदाज वर्तविला जाऊ शकतो. यासाठी उपग्रह आणि अन्य आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करता येऊ शकतो.
भारतात भूकंपासंबंधी इशारा देणार्या प्रणालीला विकसित करणे महत्त्वाचे आहे. भूकंपाच्या स्थितीत नागरिकांनी कशी खबरदारी घ्यायला हवी हे जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे. शाळा, कार्यालय, समुदायात भूकंपाच्या सुरक्षेवरून नियमित प्रशिक्षण आणि शिबिर आयोजित करणे गरजेचे आहे. याशिवाय भूकंपविरोधी किट्स जसे पाणी, भोजन, प्राथमिक आरोग्योपचार आणि अन्य गरजेचे साहित्य तयार ठेवायला हवे.
हिमालय भागात रस्ते, पूल आणि अन्य महत्त्वाच्या पायाभूत सुविधेची व्यवस्था बळकट करायला हवी. या आधारे भूकंपाच्या हादर्यातही ती चांगल्या रितीने तग धरून राहील. त्याचवेळी जुन्या व्यवस्थेची डागडुजी आणि पुनर्बांधणी करणे आवश्यक आहे.





