– डॉ. सुनीलकुमार सरनाईक दरवर्षी पावसाचे पाणी जमिनीवरून वाहून जाते. ओढे, नाले, नद्यांना पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पूर येतात. हे सर्व पाणी समुद्रात वाहून जाते. हे पाणी जर जमिनीत जिरवले गेले तर उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईवर मात करता येईल. यंदाचा पावसाळा तोंडावर आला आहे. पावसाळा आला की, अनेक समस्या व प्रश्न निर्माण होतात. प्रतिवर्षी राज्यात पाण्याचे दुर्भिक्ष मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. पाण्याची टंचाई हा नेहमीचा प्रश्न आहे. पाणीटंचाईमुळे खेडोपाड्यात, वाड्यावस्त्यांत तसेच काही प्रमाणात शहरात राहणाऱ्या जनसामान्यांचे अतोनात हाल होतात. पिण्याच्या पाण्यासाठी आजही सर्वसामान्य जनतेला पायपीट करावी लागते. पिण्याच्या पाण्यासाठी अनेक गावांमध्ये मोठा संघर्ष झाल्याचे पाहायला मिळते. हे हाल व संघर्ष टाळायचा असेल तर पावसाच्या पाण्याचा थेंब नि थेंब जमिनीत जिरवणे आवश्यक आहे. त्यासाठी सरकारने व आम जनतेने हातात हात घालून सांघिक स्वरूपात सर्वंकष प्रयत्न करण्याची गरज आहे. आज निसर्गाच्या लहरीपणामुळे पावसाचे प्रमाण बेभरवशाचे झाले आहे. कधी अवकाळी पाऊस तर कधी दुष्काळ यामुळे मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागते. भविष्यात पाण्याचे संकट टाळण्यासाठी व पृथ्वीचे वाढते तापमान नियंत्रित राखण्यासाठी अर्थात ग्लोबल वॉर्मिंगसारख्या जागतिक पर्यावरणाचा समतोल बिघडवणाऱ्या समस्या टाळण्यासाठी, शिवाय पिकांच्या वाढीसाठी व सुरक्षिततेसाठी पावसाळ्यात पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा थेंब नि थेंब जमिनीत ठिकठिकाणी जिरवण्याची नितांत गरज आहे. सध्या भूगर्भातील पाण्याची पातळी कमी कमी होत आहे. त्यासाठी कोरड्या विहिरी, नद्या, कालवे व धरणे यांच्यासाठी पावसाचे पाणी जमिनीत जिरवणे आवश्यक आहे. ग्रामीण व शहरी भागातील जनतेचे “पाण्याचे महत्त्व व आवश्यकता’ याविषयी प्रबोधन करणे गरजेचे आहे. पिण्याच्या पाण्यासाठी आजच जागरूक व दक्ष राहणे आवश्यक आहे, तरच उद्या निर्माण होणारे पाण्याचे संकट टाळणे शक्य होणार आहे. लहानमोठ्या वृक्षांची प्रचंड प्रमाणात होत असलेली तोड, नदीपात्रातील प्रचंड प्रमाणात होत असलेला वाळूउपसा, दगडांसाठी खाणीतील मोठ्या प्रमाणातील खोदकाम, डोंगर व टेकड्यांचे सपाटीकरण, ग्लोबल वॉर्मिंगसारखी दिवसेंदिवस वाढत जाणारी जागतिक समस्या, अर्थात दिवसेंदिवस वाढत जाणारे तापमान व ऋतूबद्दल या सर्व गोष्टी पाण्याच्या दुर्भिक्ष व टंचाईसाठी कारणीभूत आहेत. या पार्श्वभूमीवर पावसाचे पाणी वाहून जाण्यापेक्षा या पाण्याचे योग्य नियोजन करून जमिनीतच जिरवणे शक्य आहे. पावसाळ्याचा मोसम चार महिन्यांचा असतो, शिवाय अलीकडच्या काळात बेमोसमी अर्थात अवकाळी पाऊस पडत आहे. अशावेळी पावसाचे पाणी आडविणे, ते साठवून ठेवण्याची व्यवस्था करणे तसेच ते भूगर्भात जिरवणे याचे महत्त्व अधोरेखित करून कृती करणे गरजेचे आहे. निसर्गाच्या कृपेने मिळणारे पावसाचे पाणी जमिनीत जिरवण्यासाठी खालील उपक्रम राबविले जाणे आवश्यक आहे. पावसाचे पाणी शेतात जिरवणे चार महिन्यांच्या पावसाळी मोसमात पडणाऱ्या पावसाच्या पाणी आपापल्या शेतात जिरवावे, अशी प्रत्येक शेतकऱ्यांकडून अपेक्षा आहे. यासाठी शेतकऱ्यांनी शेतात चर खोदून तयार ठेवावे, पक्के बांध बांधून घ्यावेत व पावसाचे पाणी आपल्या शेतात कसे जिरेल यासाठी सर्वंकष प्रयत्न करावेत. माळरान व पडिक जमिनीत पाणी जिरवा माळरानावर, गायरानात व सरकारी पडिक जमिनीत तसेच गावठाण क्षेत्रात पडणारे पावसाचे पाणी शेतकरी बांधवांनी अडवण्यासाठी व जिरवण्यासाठी जे जे काही प्रयत्न करणे शक्य आहे ते ते करावे. या क्षेत्रात पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा पुरेपूर वापर करण्यासाठी हे पाणी आपल्या शेतात कसे वळविले जाईल, यासाठी सर्व शेतकऱ्यांनी मिळून प्रयत्न करणे आवश्यक आहे. ओढ्याचे पाणी जिरवा पावसाळ्यात ओढे, नाले पूर्णपणे भरून ओसंडून वाहत असतात. गावातील व कृषी क्षेत्रातील छोट्या नद्या, ओढे, नाले यावर बांध टाकून वाहून जाणारे पावसाचे पाणी अडविणे व जमिनीत जिरवणे नितांत गरजेचे आहे. कोल्हापूर पद्धतीचे बंधारे याकरिता चांगले उदाहरण आहे. या पद्धतीचे बंधारे राज्यभर बांधले गेले पाहिजे. पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण करणे पावसाच्या पाण्याचे विविध मार्गांनी पुनर्भरण करणे शक्य आहे, ओढ्याचे पाणी विहिरीत सोडता येते. छतावरचे पावसाचे पाणी हापशात सोडणे, इतरत्र पडत असलेले पावसाचे पाणी टाक्या बांधून त्यात साठवून त्याचा वापर आवश्यकता पाहून करता येतो. विशेष म्हणजे साठवण केलेले व झाकून ठेवलेले पाणी कधीही दूषित होत नाही. वृक्ष लावून त्याचं संरक्षण व संवर्धन जमिनीची व शेतातील मातीची धूप थांबविण्यासाठी शिवाय पाऊस मुबलक प्रमाणात पडण्यासाठी जागोजागी वृक्ष लावून त्यांचे संरक्षण व संवर्धन करणे गरजेचे आहे. वृक्षांमध्ये जलाकर्षण शक्ती असते, हे लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याची गरज आहे. निसर्ग भरभरून देत असतो, निसर्गाच्या कृपेने मिळणारे पावसाचे पाणी अडविणे व जमिनीत जिरवणे गरजेचे आहे. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी वैयक्तिक वा सांघिक स्वरूपात प्रामाणिकपणे व जबाबदारीने पाणी अडविणे व जमिनीत जिरवणे ही कृती केल्यास भूजल पातळीत कमालीची वाढ होईल आणि पाण्याचे दुर्भिक्ष, पाणीटंचाई दूर होण्यासाठी मोठा हातभार लागेल.