– डॉ. वि. ल. धारूरकर
पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी होणारे ग्वादर या ठिकाणच्या नव्या विमानतळाचे उद्घाटन चीनचे पंतप्रधान ली यांच्या हस्ते नुकतेच आभासी पद्धतीने झाले. बलुचींमुळे यास उशिरा झाला का?
चीनने अलीकडे पाकिस्तानमध्ये ग्वादर या बलुचिस्तानातील मोक्याच्या ठिकाणी 2 हजार कोटी डॉलर्सचा चुराडा करून नवे विमानतळ उभारले आहे. शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन म्हणजे शांघाय सहकार परिषद या संघटनेच्या बैठकीसाठी 15 व 16 ऑक्टोबर रोजी चीनचे पंतप्रधान ली हे इस्लामाबादेत दाखल झाले असताना त्यांच्या हस्ते या विमानतळाचे आभासी उद्घाटन करण्यात आले. ‘सणात पाहुणा’ या न्यायाने चीनने हा घाट घातला. 14 ऑगस्टला होऊ घातलेला उद्घाटन सोहळा का लांबणीवर पडला? त्यामागे कोणती कारणे आहेत? भूराजनैतिकदृष्टीने चीनने जे मिळविले ते त्याला टिकविता येईल काय? पाकच्या नाकात दोरी बांधणार्या बलुची बंडखोरांचे आव्हान पाकिस्तानला का पेलवत नाही? असे अनेक प्रश्न उभे राहतात.
ग्वादर विमानतळाचा इतिहास 1958 पासून जुना आहे. पाकिस्तान सरकारने ग्वादर मस्कतच्या सुलतानाकडून विकत घेतले आणि 1956 मध्ये त्याच्या विकासाला प्रारंभ केला. कराची ते मस्कत ग्वादरमार्गे फोकर एफ27 विमानांची उड्डाणेही सुरू झाली. पुढे नव्या टर्मिनल इमारतीचे उद्घाटन 1984 मध्ये करण्यात आले. प्रामुख्याने ग्वादरमध्ये राहणार्या लोकांना ही विमानसेवा उपलब्ध झाली. 2008 मध्ये तेथे महत्त्वाच्या व्यक्तींसाठी विश्रामगृहे व अन्य सुविधा उभारण्यात आल्या. 2014 मध्ये उच्च प्राथमिकता म्हणून विमानतळाच्या उभारणीस प्रारंभ झाला. 29 मार्च 2019 रोजी माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी एनजीआयएची पायाभरणी केली होती. या विमानतळाची प्राथमिक हाताळणी क्षमता 30 हजार टन एवढी होती.
तसेच त्यामध्ये मालवाहतूक, नाशवंत गोष्टींची वाहतूक यासाठीही योजना होती. एअरबस ए380, बोइंग 747 सारख्या विमानांची वाहतूकही या विमानतळावर होऊ शकेल एवढी व्यापक व्यवस्था करण्यात आली आहे. 1 ऑगस्ट 2023 रोजी नॅशनल असेंब्लीने ठराव करून विमानतळाचे नाव फिरोज खान नून विमानतळ असे ठेवण्याचा निर्णय घेतला आणि प्रादेशिक विधानसभेनेसुद्धा त्याला अनुमती दिली. ग्वादर सुरक्षित करण्यासाठी ओमानच्या सुलतानाबरोबरही करार करण्यात आला आहे.
नियोजित प्रकल्पातील ग्वादर विमानतळ म्हणजे पाकिस्तान-चीन इकॉनॉमिक कॉरिडॉरचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. पाकिस्तानच्या पाठीवर बसून चिनी ड्रॅगनला दक्षिण आशिया भागात धुडगूस घालावयाचा आहे. त्यासाठी हे विमानतळ म्हणजे त्याचे हेलीपॅड बनणार आहे. चीनने त्यासाठी पाकिस्तानला निधी दिला, मनुष्यबळ दिले, तंत्रज्ञान दिले आणि आपल्या आर्थिक धनाची दोरीही ढिली सोडली. पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनी म्हणजे 14 ऑगस्ट रोजी या विमानतळाचे उद्घाटन होणार होते. पण माशी शिंकली. खुद्द पंतप्रधान शाहबाज शरीफ हे चिनी अधिकारी व्यक्तीसमवेत या विमानतळाचा प्रारंभ करून मोठेपणा मिरविणार होते.
पण बलुची बंडखोरांच्या प्रतापामुळे हे उद्घाटन तेव्हा पुढे ढकलण्यात आले होते. चिनी ड्रॅगनच्या साम्राज्यवादी पंखांना अशाप्रकारे बलुची बंडखोरांनी लगाम घातला एवढे मात्र खरे. इस्लामाबाद, कराची, लाहोर, पेशावर या शहरात पाकिस्तानात जी काही विमानतळे आहेत त्यापेक्षा आता चीनच्या मदतीने उभारलेले ग्वादर हे सर्वात मोठे विमानतळ असणार आहे. त्याचा उपयोग नागरी वाहतुकीप्रमाणे लष्करी संरक्षणाच्यादृष्टीने हालचाली करण्यासाठी होऊ शकेल.
लाल ड्रॅगन सरकार आणि पाकिस्तानी सरकार यांच्यात 2015 मध्ये या संभाव्य विमानतळासाठी करार झाला. 2019 मध्ये त्या कामाचा आरंभ झाला होता. आता 2024 मध्ये 5 वर्षांनी हेच काम मार्गी लागले व पूर्ण झाले. अमेरिकेच्या मोठ्या एअरबससारखी प्रचंड विमानेही या विमानतळावर उतरू शकतील. चीनने पाकिस्तानप्रमाणेच नेपाळ, श्रीलंका, कंबोडिया, झिम्बाब्वे या देशांतही अशी मोठी विमानतळे उभारण्याचा घाट घातला आहे.
चिनी ड्रॅगनचे खाण्याचे आणि दाखविण्याचे दात भिन्न असतात. चीनला पाकिस्तानच्या प्रेमाचा उमाळा का आला आहे? कारण कर्जे देऊन, खूश करून पाकिस्तानला दबावाखाली ठेवण्याची चीनची भूमिका आहे. याच ग्वादर परिसरात चीनने एक बंदरही उभारले आहे. त्यामुळे अरबी समुद्रात चीनला पाकिस्तानच्या पाठीवर बसून मुक्त संचार करता येईल. तेथून त्याला मलाक्का म्हणजे आग्नेय आशियातील मलेशियाच्या सामुद्रधुनीपर्यंत संपर्क करता येईल. तेथील व्यापारावर ताबा मिळविण्याचा हा ड्रॅगनचा कावा आहे. हे बंदर चीनच्या शेनयांग प्रांतानजीक वसलेले आहे. त्यामुळे चीनला व्यापारीदृष्टीने आग्नेय आशियावर प्रभुत्व गाजविणे शक्य होईल.पण यामध्ये बलुची बंडखोरांचे आव्हान बिकट बनले आहे.
बलुची बंडखोरांच्या कारवायांमुळे पाकिस्तानच्या डोक्यावर अस्थिरतेची सतत टांगती तलवार आहे. गेल्या काही महिन्यांपासून बलुचिस्तानातील बंडखोरांनी एकानंतर एक धमाके सुरू केले आहेत. बसमध्ये प्रवाशांना उतरवून झालेला हत्येचा प्रसंग, त्यानंतर दोन वेळा झालेले मोठे बॉम्ब हल्ले या सर्व परिस्थितीतून मार्ग कसा काढावयाचा याची मोठी चिंता पाकिस्तानला आहे.
बलुचिस्तान नॅशनल आर्मी (बीएनए) या फुटीरतावादी संघटनेने स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी केली आहे व त्यांना शेकडो बलुची लोकांचा उत्स्फूर्त पाठिंबा आहे. चीन बलुचिस्तानमध्ये घुसून आपल्या नैसर्गिक साधनसामग्रीचे शोषण करीत आहे व पाकिस्तान त्याला मोकळे रान देत आहे, याचे दुःख बलुची लोकांना वाटणे साहजिक आहे. बलुचिस्तान हा पाकमधील सर्वात मोठा भूप्रदेश आहे. तेथे तेल, नैसर्गिक वायू, सोने, चांदी व कोळशाच्या खाणी आहेत. चीनचा या सर्व सामग्रीवर डोळा आहे. उलटपक्षी, स्थानिक बलुची लोकांना सर्व विकास प्रकल्पांपासून कटाक्षाने दूर ठेवले आहे. त्यांच्याच भूमीवर हे विमानतळ झाले पण तेथे बलुची लोकांना साधा प्रवेशही दिला जात नाही.
स्थानिक लोकांना विकासापासून वंचित ठेवून विमानतळ बंदराचा विकास आणि खाण संशोधन यासारख्या प्रकल्पांचा आम्हाला काय फायदा? असा प्रश्न स्थानिक बलुची तरुण विचारीत आहेत. म्हणून बलुची संघटनांमध्ये पाकिस्तान व चीनविषयी असंतोष आहे. खास करून चीन हा आपल्या मातृभूमीचे शोषण करण्यासाठी आला आहे, आम्हाला गुलामगिरीत ढकलणार आहे, शत्रूचा मित्र तो आमचा शत्रू या न्यायाने बलुची लोक चिनी ड्रॅगनकडे पाहात आहेत.
भविष्यकाळात चीन बलुचिस्तानला ओरबाडून काढील आणि त्याचा पुढील 100 वर्षांत फक्त सापळा उरेल या भीतीने बलुची तरुण वर्ग चिंताग्रस्त झाला आहे. त्यामुळे चिनी अभियंते, कामगार, कुशल मनुष्यबळ यावर एकानंतर एक हल्ले करून बलुची संघटना थरकाप उडवून देत आहेत. चीनला बलुचिस्तानातून संभाव्य विस्तारापासून रोखणे हा बीएनएचा अंतिम हेतू आहे. चिनी ड्रॅगनचा वसाहतवाद पाकिस्तानच्या लक्षात आला नाही. परंतु तो बलुची तरुणांच्या लक्षात आला. त्यांना आपली नैसर्गिक साधनसामग्री चीनपासून सुरक्षित ठेवायची आहे.
भविष्यात बलुचिस्तानकडे असेच दुर्लक्ष झाले तर तेथील तरुण वर्ग पाक व चीनचे कवच झुगारून देऊन स्वातंत्र्याच्या दिशेने वाटचाल करू लागतील. चिनी ड्रॅगनच्या ‘वन बेल्ट वन रोड’ या पुढाकाराला अनेक देश कंटाळले आहेत. त्यापैकी बलुची लोक हेही आहेत. चिनी ड्रॅगनच्या उड्डाण पंखांना बलुची संघटनांनी तूर्त तरी चांगलाच लगाम घातला आहे असे म्हणता येईल.