– सुचित्रा दिवाकर
नासाच्या अंतरिक्ष शास्त्रज्ञ मेगन मॅक्आर्थर यांनी अंतरिक्षात आपले केस हौसेने शॅम्पू केले, एवढेच नव्हे तर त्याचा व्हिडिओ तयार करून जगाला दाखविला आहे. जिथे प्रत्येकाच्या वाट्याला अवघे 70 लिटर पाणी येते आणि ते अनेक महिने पुरवावे लागते, तिथे त्यांनी ज्या प्रकारे केस शॅम्पू केले, त्यापासून अंतरिक्ष शास्त्राच्या विद्यार्थ्यांना तर बळ मिळेलच; परंतु कमीत कमी पाण्यात कसे जगायचे याचे धडे पाण्याची उधळपट्टी करणाऱ्यांना मिळतील.
अंतराळ शास्त्रज्ञ आता अंतरिक्षात महिनोन्महिने राहू लागले आहेत. त्यामुळे अर्थातच कधीतरी त्यांना अंघोळ करण्याची इच्छा होत असेल. परंतु ते तिथे अंघोळ करू शकतात का? असा प्रश्न सर्वसामान्यांना नक्की पडेल. परंतु या प्रश्नाचे उत्तर कदाचित “होय’ असे आहे.
नासाच्या अंतरिक्ष शास्त्रज्ञ मेगन मॅक्आर्थर यांनी अंतरिक्षात आपले केस हौसेने शॅम्पू केले, एवढेच नव्हे तर त्याचा व्हिडिओ तयार करून जगाला दाखविला आहे. आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष स्थानक हे पृथ्वीच्या कक्षेत फिरत असलेल्या एका अत्याधुनिक घरासारखेच आहे. तिथे गुुरुत्वाकर्षणाची स्थिती अशी आहे, की जवळजवळ प्रत्येक गोष्ट तरंगती ठेवता येते. मुळात अंतरिक्ष यान स्वतःच तरंगत भ्रमण करीत आहे,
त्यामुळे आतील बहुतांश वस्तूही तरंगत्याच आहेत. अगदी पाणीसुद्धा तेथे हवेत तरंगते. त्यामुळे अंघोळ करायची असेल किंवा केस शॅम्पू करायचे असतील, तर सर्वांत आधी पाणी अडवून एकत्र करावे लागते. त्या ठिकाणी पाणी अशा प्रकारे वापरावे लागते, जणू ते संपले तर जीवनच संपले! अंतरिक्षात सध्या जी स्थिती आहे,
त्यानुसार शास्त्रज्ञ जे पाणी खर्च किंवा उत्सर्जित करतात, ते पुन्हा वाचवूनही ठेवतात. खराब झालेले पाणी शुद्ध करून पिण्यालायक बनवितात, जेणेकरून त्यांच्या वाट्याला आलेल्या 70 लिटर पाण्यातील एक थेंबही वाया जाऊ नये. जिथे प्रत्येक थेंबाची चिंता करावी लागते, तिथेही अंघोळ करणे शक्य आहे.
मेगन मॅक्आर्थर यांनी केस शॅम्पू केले, याचा अर्थ असा नव्हे की त्यांनी आधी काही मग पाणी घेऊन आपले केस भिजवले आणि नंतर शॅम्पू करून त्यावर पुन्हा काही मग पाणी ओतून केसांचा फेस काढून टाकला. मेगन यांनी सर्वांत आधी दोन किंवा तीन बाजूंनी कागद आणि कपड्यांचा आडोसा तयार केला आणि त्यानंतर एका टॉवेलमध्ये पाणी घेतले.
म्हणजेच, टॉवेल भिजवला आणि तो केसांवरून फिरवून केस ओले केले. त्यानंतर शॅम्पूचे काही थेंब त्यांनी आपल्या केसांवर व्यवस्थित लावले आणि त्यानंतर टॉवेलच्या कोरड्या बाजूने आपले केस पुसून घेतले. तरीही काही थेंब तरंगत इकडेतिकडे गेलेच. त्यांनी ते थेंब पुन्हा टॉवेलमध्ये गोळा केले, जेणेकरून टॉवेल पिळून पुन्हा ते पाणी साठविता येईल आणि ते पुन्हा प्रक्रिया करून पिण्यालायक करता येईल.
मेंदूच्या एकाग्रतेसाठी जर केसांची स्वच्छता महत्त्वपूर्ण असेल तर अंतरिक्षात आपल्या वाट्याला आलेले पाणी वाचविणे त्याहून अधिक महत्त्वाचे आहे. शून्य गुरुत्वाकर्षण किंवा मायक्रोग्रॅव्हिटी असलेल्या क्षेत्रात आपले केस स्वच्छ करून जगाला त्याचा व्हिडिओ दाखविणाऱ्या मेगन या पहिल्या महिला अंतरिक्ष शास्त्रज्ञ ठरल्या आहेत. हा खूपच रंजक किस्सा आहे आणि त्यामुळे अन्य अंतरिक्ष शास्त्रज्ञांनाही थोडाफार आनंद मिळेल.
पृथ्वीवर राहणारे आपण नागरिक किती प्रमाणात पाणी व्यर्थ घालवत असतो. आपण अंतरिक्षातील या परिस्थितीत काम करणाऱ्या शास्त्रज्ञांकडून काहीतरी शिकले पाहिजे. अगदी थोड्या पाण्याचा वापर करूनसुद्धा जगणे शक्य आहे. पृथ्वीवरही प्रत्येक माणूस आपल्या वाट्याला आलेले पाणी असेच वाचवू शकेल का आणि शुद्धीकरण करून त्याचा पुनर्वापर करू शकेल का? किमान ज्या भागांमध्ये पाण्याचा प्रचंड तुटवडा आहे, तिथे असा विचार करणे निश्चितच प्रासंगिक ठरेल. दुसरी गोष्ट अशी की,
अंतरिक्ष शास्त्रज्ञांकडून केले जात असलेले असे प्रयोग हा त्यांच्याकडून स्वतःला प्रदीर्घ मोहिमेसाठी तयार करण्याच्या प्रक्रियेचा एक भाग आहे. जेव्हा आपण चंद्रावर किंवा मंगळावर पाऊल ठेवण्याचा विचार करू तेव्हा असेच करावे लागेल. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवावा लागेल.
मेगन मॅक्आर्थर या 50 वर्षीय
अंतरिक्ष शास्त्रज्ञ महिलेने गेल्या एप्रिल महिन्यात अंतरिक्षात दुसऱ्यांदा पाऊल ठेवले आहे. चार महिन्यांपेक्षा अधिक काळ त्या अंतरिक्ष स्थानकावर आहेत. त्यांना केस शॅम्पू करण्याची गरज भासलीच असणार; परंतु ही कृती त्यांनी ज्या प्रकारे केली, ती अंतरिक्ष शास्त्रातील विद्यार्थ्यांना बळ देणारी ठरणार आहे, हे निश्चित!