लक्षवेधी : विषाणूच्या विळख्यातील पर्यटन विश्‍व

आशिष हिंगमिरे

मागील वर्षापासून करोना आणि लॉकडाऊनमुळे पर्यटन व्यवसाय पूर्णपणे ठप्प आहे. आताही करोना पुन्हा आला आहे. त्यामुळे पर्यटन क्षेत्राच्या समस्या आणि पुढील नियोजन याबाबत घेतलेला थोडक्‍यात आढावा…

देशाच्या अर्थव्यवस्थेच्या 10 टक्‍के जीडीपी देणारे, देशाच्या तिजोरीत तब्बल 17 लाख कोटी रुपये उत्पन्न मिळवून देणारे आणि देशातील 4 कोटींपेक्षा जास्त लोकांना रोजगार देणारे पर्यटन क्षेत्र पुन्हा एकदा करोना विषाणूजन्य आजाराच्या महासंकटात सापडले आहे.

तसे सगळ्यात आधी म्हणजेच मागील फेब्रुवारी 2020 मध्येच पहिले विमानसेवा आणि व्हिसा हे सगळं रद्द झालं. पहिल्या लॉकडाऊनपासून बंद पडलेलं आणि सर्वात जास्त नुकसान झालेलं क्षेत्र म्हणजे पर्यटन.

आता कुठे परिस्थिती सुरळीत होत होती, 30-40 टक्‍के व्यवसाय रुळावर येत होता, पण पुन्हा एकदा सगळी जुळवाजुळव करताना व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. तशातच पुन्हा करोना आला आणि त्या सोबतच लॉकडाऊनही. तसं पर्यटन म्हटले की उन्हाळी सुट्ट्या.

याचे पूर्वनियोजन करण्याच्या तयारीत पर्यटक असतानाच करोनासारख्या विषाणूजन्य महासंकटाने पर्यटन व्यावसायिकाला आणि पर्यटकांना अस्वस्थ करून टाकले आहे. देशाअंतर्गत जे काही टूर्स चालू होत्या त्या सर्व सहली रद्द होत चालल्या आहेत आणि यामागे कित्येक महिने मेहनत घेणाऱ्या पर्यटन कंपन्या आणि हतबल झालेला पर्यटक आज कॅन्सलेशन्स आणि रिफंडच्या मागे धावताना दिसत आहेत.

खरंतर मागील काही वर्षांमध्ये सुरू असलेली जागतिक पातळीवरील मंदीचा परिणाम सर्वच क्षेत्रावर होत होता. त्यात भर म्हणून करोनाच्या विळख्यात अडकलेले आर्थिक व्यवस्थापन सावरण्यास लागणारा काळ हा अजून तरी अनिश्‍चितच दिसत आहे. 

जागतिक पर्यटन पाहता नैसर्गिक आपत्ती, जागतिक हवामान बदल, आंतरराष्ट्रीय पातळीवरील वाढत चाललेली राजकीय आंदोलने, सीमावाद अशा एक ना अनेक परिस्थितींमुळे निर्माण झालेली अस्थिरता आणि याच बरोबर आपल्या देशातील टुर कंपन्यांच्या मागे तगादा लावून बसलेली नोटबंदी, अनिश्‍चित करप्रणाली, बुकिंगसाठी पॅनकार्ड तसेच रोख रकमेवरील बंधने आणि टीसीएससारखा नवा कर यामुळे एकामागून एक हादरे पर्यटन व्यवसायाला बसत आहेत.

मुख्य म्हणजे भारतातील प्रत्येक राज्याने लागू केलेले नियम हे रोज बदलत असल्यामुळे पर्यटक संभ्रमावस्थेत आहे, त्यात आता विमान अथवा रेल्वेचे काय तर बसमधून प्रवास करायचा असल्यास आरटी-पीसीआर टेस्ट अनिवार्य केली आहे. यामध्ये खूप लोकांची फरपट झालेली आपण पाहिली.

नियम तर पाळलेच गेले पाहिजेत पण करोनाचा फटका हा या सर्व संकटमालिकेतील भीषण अध्याय ठरत आहे, तब्बल 55 पेक्षा जास्त देशांमध्ये करोनाचा प्रसार झाल्याने अनेक देशांनी त्यांच्या सीमाच बंद केल्या. जवळजवळ सगळ्याच देशांनी त्यांचे व्हिसा रद्द केले आहेत. साहजिकच यामुळे पर्यटनासाठी बाहेर जाण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही, देशातही तो पुन्हा एकदा झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाला हतबल होऊन देशव्यापी लॉकडाऊनच्या दिशेने पाऊल टाकावे लागत आहे.

ऐन पीक सीझनमध्ये विमान कंपन्या, हॉटेल्स, वाहनचालक- बस कंपन्या, पर्यटनस्थळावरील गाइड्‌स अशा अनेक जणांवर जणू संक्रांत ओढविली आहे. करोनामुळे ओढावलेले संकट हे जागतिक आहे, त्याला सामूहिकरित्या लढा द्यायचा आहे आणि हे करताना सहकार्य भावना आणि सामंजस्य सर्वात महत्त्वाचे आहे. मग जागतिक संकट ओढवले असताना कुठलाही विचार न करता पर्यटन व्यावसायिक आणि पर्यटक हा प्रशासनाच्या बाजूने सहकार्य करताना आज दिसत आहे.

बहुतांश टुर आणि विमान कंपन्यांनी आपापल्या संकेतस्थळांवर टुर कॅन्सलेशन्स आणि रिफंड प्रोसेस जाहीर केल्या आहेत. तेव्हा पर्यटक घर बसल्या आपले विमान तिकीट अथवा टुर रिशेड्युल करू शकतात. तसेच महत्त्वाचं म्हणजे आपण टुर बुक केली असता ती आता कॅन्सल न करता पुढच्या काळात रिशेड्युल करून घेण्याचे आवाहन जाहीररीत्या करण्यात आले आहेत.

जिथे बरेच पर्यटक विमान अथवा हॉटेल बुकिंगसाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध असल्याने टुर ऑपरेटरशी संपर्क न करता घरबसल्या स्वतः बुकिंग करतात, आज अशा अनेक जणांना आपले बुकिंग रद्द करण्यासाठी किंवा संपर्क साधण्यासाठी असलेली व्यवस्था ठप्प झाली आहे आणि असे असताना ट्रॅव्हल एजंट आणि टुर कन्सल्टंट त्यांच्या मागे सर्वोतोपरी मदत करण्यास ठाम उभा आहे.

अशा संकटकाळी पर्यटकांनी संयम बाळगून संबंधित टुर ऑपरेटर्सना सहकार्य करून पर्यटन विश्‍वाला धीर देणे गरजेचे आहे. केंद्र व राज्य सरकार जसे बॅंका, कॉर्पोरेट उद्योग, शेतकरी अशा सर्वांना अडचणीच्या प्रसंगी पॅकेज, कर्जमाफी देऊन उभारणीसाठी प्रोत्साहन देणाऱ्या सरकारी व्यवस्थेने पर्यटन उद्योगाकडेही लक्ष द्यावे आणि संकटाची काळरात्र सरून जण्यास मदतीचा हात द्यावा. सरकार पर्यटन क्षेत्रात 5 टक्‍क्‍यांपासून 28 टक्‍क्‍यांपर्यंत कर वसूल करत असताना बाहेरील देशात जसे आपत्ती व्यवस्थापन होते तसे नक्‍कीच केले पाहिजे. विमान कंपन्या आणि हॉटेल व्यावसायिकांना कॅन्सलेशन्स संदर्भात धोरण आखून कमीत कमी नुकसान होईल असे बघावे.

बाकी सर्व पर्यटन व्यावसायिकांना या महासंकटातून सावरण्यास किती काळ लागेल याची चिंता करत असताना दरम्यानच्या काळात व्यावसायिकांनी स्वतःला अपग्रेड करून आपल्या व्यवसायातील त्रुटी शोधून त्याचे निरसन करूया. बॅंकिंग व्यवहारातील अपूर्ण कामे तसेच ऑडिटमध्ये लागणारी व्यवस्था अपडेट करूया. पुढील काळात नवीन डेस्टिनेशन लॉंच कसे करता येईल या सर्व गोष्टींचा अभ्यासपूर्वक निर्णय घेऊया.

पुन्हा एकदा सर्व मिळून एकजुटीने या महासंकटाचा सामना करून स्वतः बरोबर दुसऱ्यांची देखील काळजी घेऊ.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.