– हेमंत देसाई प. बंगालमधील विधानसभा निवडणुकीत भाजप आणि ममतादीदी आमनेसामने असताना, आता शरद पवार हेदेखील कोलकात्यात जाऊन दीदींची भेट घेणार असल्याचे सांगण्यात येते. त्याबाबत… पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुका नजीकच्या टप्प्यात असून, तृणमूल कॉंग्रेस आणि भाजपमध्ये मागील काही महिन्यांपासून घमासान सुरू आहे. एका कार्यक्रमात बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “बंगालची भूमी हा जीवनाचा स्रोत आहे. आपल्याला ही भूमी सुरक्षित ठेवावी लागेल. आम्ही बंगालचा गुजरात होऊ देणार नाही. हिंदू, मुस्लीम, शीख, ख्रिश्चन यांच्यात फूट पाडू देणार नाही.’ राष्ट्रगीत आणि जयहिंदचा नारा प. बंगालमधून देण्यात आला. तेथे राष्ट्रीय एकात्मता जपण्याची परंपरा आहे, हे खरेच आहे. भाजपचे राजकारण धार्मिक ध्रुवीकरणावर चालते. परंतु घोषणा मात्र “सबका साथ सबका विकास’, अशा दिल्या जातात. रवींद्रनाथ हे राष्ट्रवादाचे उद्गाते होते, असे वक्तव्य पंतप्रधान मोदी यांनी अलीकडेच शांतिनिकेतनाच्या एका कार्यक्रमात बोलताना केले. वस्तुतः रवींद्रनाथ हे राष्ट्रवादाच्या संकल्पनेच्या विरोधात होते व ते स्वतःला जगाचा नागरिक म्हणवून घेत. राज्यातील तीन ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना प्रतिनियुक्तीवर पाठवण्याबाबत अलीकडेच केंद्र सरकारने आदेश जारी केला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्याच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले हे अधिकारी होते. त्यांच्यावर निष्काळजीपणाचा आरोप ठेवून, त्यांना तातडीने केंद्रात प्रतिनियुक्तीवर पाठवण्याचे आदेश केंद्रीय गृहखात्याने प. बंगाल सरकारला दिले आहेत. त्यास मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आक्षेप घेतला असून, हा सत्तेचा दुरुपयोग असल्याचे म्हटले आहे. माझे सरकार विस्तारवादी आणि लोकशाहीविरोधी शक्तींसमोर झुकणार नाही, असेही ममतादीदींनी सुनावले आहे. प. बंगालमधील 70 लाखांपेक्षा जास्त शेतकरी बांधव किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत, तृणमूल सरकारच्या कारवायांमुळेच हे पैसे मिळत नाहीत, असा आरोप नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. या आरोपास ममतादीदींनी उत्तर दिले असले, तरी त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे समाधान होऊ शकणार नाही. किती लाख शेतकऱ्यांना फायदा मिळाला व कितींना मिळाला नाही याची आकडेवारी त्यांनी जाहीर केली पाहिजे. तृणमूल कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व मंत्री शुभेंदु अधिकारी यांनी पक्षाला राम राम ठोकला आणि त्यांच्यापाठोपाठ आणखी काही आमदारांनी भाजपात प्रवेश केला आहे. प. बंगालमध्ये यावेळी भाजपला दोनशेपेक्षा अधिक जागा मिळतील, अशी गर्जना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यात केलेल्या प्रचार दौऱ्याच्या वेळी केली. परंतु दीदींचे राजकीय चाणक्य प्रशांत किशोर यांनी या दाव्याची खिल्ली उडवली आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारवर रोजच्या रोज आरोप करून, ते सरकार पाडण्याचा उपद्व्याप सुरू आहेच. हे सरकार फार काळ टिकणार नाही, असे अंदाज व्यक्त केले जात आहेत. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी तर, येत्या मार्चमध्ये हे सरकार पडणार, असा दावा केला आहे. मात्र या सरकारचे शिल्पकार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार असून, ते नरेंद्र मोदी, अमित शहा, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सगळ्यांना पुरून उरले आहेत. आपल्या एका माजी मित्रपक्षाने व्यवस्थित खेळी करून बाजी उलटवली, हे भाजपला डाचते आहे. तिकडे शिरोमणी अकाली दलाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीबाहेर पडून, शेतकऱ्याच्या प्रश्नावर केंद्राला आव्हान दिले. योगायोग म्हणजे, त्यानंतरच शेतकरी आंदोलन पेटले आणि दिल्लीत लाखो शेतकऱ्यांनी तळच ठोकला. कितीही डोळे वटारले, तरी तिकडे ममतादीदीही भाजपच्या दबावास बळी पडायला तयार नाहीत, हेही दिसत आहे. दीदींनी दोन वेळा मुख्यमंत्री म्हणून यशस्वी कारभार केला असून, यावेळी त्या विजयी झाल्यास, पुन्हा एकदा त्याच मुख्यमंत्री होतील. यापूर्वी मुख्यमंत्री नसताना उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरेंसमवेत ममतादीदींची एकदा भेट घेतली होती. आता शरद पवार हेदेखील कोलकात्यात जाऊन दीदींची भेट घेणार असल्याचे सांगण्यात येते. पवारांप्रमाणे दीदींनीही कॉंग्रेसचा त्याग करून, आपला प्रादेशिक पक्ष स्थापन केला आहे. मोदी सरकारने संघराज्य व्यवस्थेवर हल्ले केले असून, त्यावर पवार आणि दीदी सातत्याने टीका करत आहेत. त्यामुळे या एका मुद्द्यावर हे दोन नेते एकत्र येऊ शकतात आणि पवारांचे मार्गदर्शन दीदींना उपयुक्त ठरू शकते. देशातील आपल्या विरोधातील प्रादेशिक पक्षांचे खच्चीकरण करणे आणि जे बरोबर आहेत त्यांना लाचार बनवणे, हे भाजपचे धोरण राहिले आहे. नुकत्याच हैदराबादेतील महापालिका निवडणुकांत भाजपने जोरदार प्रचार करून यश मिळवले. त्यामुळे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव अस्वस्थ झाले असून, ते भाजपवर चौफेर टीका करू लागले आहेत. तामिळनाडूत अण्णाद्रमुक हा भाजपचा मित्रपक्ष असला, तरी काही मुद्द्यांवरून त्यानेही भाजपबाबतचे आपले मतभेद प्रकट केले आहेत. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टालिन तसेच चंद्रशेखर राव यांचा तेलंगण राष्ट्र समिती हा पक्ष यांच्याशी शरद पवार संपर्क ठेवून आहेत. आपला मित्रपक्ष प्रबळ होऊ लागताच भाजप त्याला कसा दाबतो, हे बिहारमधील नितीशकुमार यांच्या जदयूच्या उदाहरणावरून स्पष्ट होते आणि हाच मुद्दा पवार या बड्या नेत्यांना अधोरेखित करून सांगत आहेत. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरेंद्र सिंग यांच्याशी पवार आणि ममतादीदी चर्चा करत असल्याचे समजते. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याशीही पवार यांची सातत्याने चर्चा सुरू असते. ममतादीदींनाही पवार सल्ले देत असतात. अमित शहांच्या बंगाल दौऱ्यांना एका मर्यादेबाहेर महत्त्व देऊ नका, तसेच माझ्या कुटुंबातील कोणीही व्यक्ती सत्तापदावर जाणार नाही, हे जाहीर करून टाका, असाही मौलिक सल्ला पवारांनी त्यांना दिला आहे. दीदींचा भाचा अभिषेक बॅनर्जी याचा तृणमूलमधील वाढता प्रभाव हा टीकेचा विषय बनला आहे. त्यामुळे पवार यांनी दीदींना जे सांगितले, ते योग्यच आहे. प. बंगालमधील भाजपचा रथ रोखण्यासाठी दीदींना तेथील कॉंग्रेस व डावी आघाडी यांच्यावरही फार टीका करण्याचे टाळावे लागेल. दीदी कशी पावले टाकतात, यावरच निवडणुकांचा निकाल अवलंबून आहे.