अपर्णा देवकर
अमेरिकेने अफगाणिस्तानातून फौजा मागे घेतल्यानंतर चीनने बगराम हवाई तळावर लक्ष केंद्रित केले आहे. चीन या हवाई तळावर कब्जा करू इच्छित आहे, असा इशारा संयुक्त राष्ट्रांमधील अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हेली यांनी दिला आहे.
2001 सालापासून अमेरिकी लष्कराच्या ताब्यात असलेला हा तळ व्यूहात्मक दृष्टीने महत्त्वाचा असल्यामुळेच चीन तो बळकावू पाहील, अशी धास्ती व्यक्त केली जात आहे.
मूळ भारतीय वंशाच्या अमेरिकी राजनैतिक अधिकारी आणि संयुक्त राष्ट्रांतील अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हेली यांनी इशारा दिला आहे की, चिनी ड्रॅगन अफगाणिस्तानातील बगराम हवाई तळावर कब्जा करू शकतो. याच हवाई तळावरून अमेरिकी फौजा आसपासच्या प्रदेशावर हल्ले चढवीत होत्या.
भारताविरुद्ध आपली स्थिती अधिक भक्कम करण्यासाठी चीनकडून पाकिस्तानचा वापर केला जाऊ शकतो, असाही इशारा त्यांनी दिला आहे. हा बगराम हवाई तळ चीनच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण का आहे, हे समजून घेतले पाहिजे. निक्की यांच्या म्हणण्यानुसार, अफगाणिस्तानातून लष्कर मागे घेतल्यानंतर अमेरिकेने चीनवर बारकाईने नजर ठेवणे आवश्यक आहे.
निक्की यांनी म्हटले आहे की, “आपण (अमेरिकेने) चीनवर अधिक लक्ष ठेवण्याची गरज आहे, कारण चीनची पावले बगराम हवाई तळापर्यंत पोहोचू शकतात, असे वाटते. अफगाणिस्तानातही पाय रोवण्याचा प्रयत्न चीन करीत आहे आणि भारताविरुद्ध आपली स्थिती आणखी मजबूत करण्यासाठी चीन पाकिस्तानचा वापर करण्याच्या प्रयत्नांत आहे, असेही वाटते.
त्यामुळेच आपल्यासमोर अनेक आव्हाने आहेत.’ भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यासारख्या प्रमुख मित्रराष्ट्रांशी अमेरिकी अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी संपर्क साधण्याची आणि अमेरिका सदैव तुमच्यासोबत राहील, असे आश्वासन देण्याची वेळ आता आली आहे, असे निक्की यांना वाटते.
वस्तुतः अमेरिकेने गेली वीस वर्षे वायुदलाच्या बगराम हवाई तळावर कब्जा कायम ठेवल्यानंतर यावर्षी जुलै महिन्यात रात्रीच्या अंधारात अमेरिकी फौजांनी तिथून काढता पाय घेतला होता.
अफगाणिस्तानातील हा अमेरिकेचा सर्वांत मजबूत तळ होता. हा तळ सोडल्यानंतर अमेरिकेला मोठ्या प्रमाणावर टीकेलाही सामोरे जावे लागले. बगराम हवाई तळ हा या क्षेत्रातील सर्वांत चांगल्या विमानतळापैकी एक आहे. या तळावर दोन रनवे ची सुविधा आहे आणि राजधानी काबूलमधून येथे येणे-जाणे खूपच सोपे आहे. या हवाई तळावर नेहमीच लष्कराचे नियंत्रण होते. काबूलपासून या हवाई तळापर्यंतचे अंतर अवघे 40 किलोमीटर आहे.
हवाई दलाच्या बगराम तळावर 2001 पासून अमेरिकेचा ताबा होता. पाकिस्तानातील एबोटाबाद येथे लपून बसलेल्या ओसामा बीन लादेन याला ठार करण्यासाठी अमेरिकी नौदलाच्या सील कमांडोंनी याच तळावर प्रशिक्षण घेतले होते. त्यानंतर जलालाबाद हवाई तळावरून हे कमांडो एबोटाबादकडे रवाना झाले होते.
अफगाणिस्तानातील हवाई हल्ल्यांचे संचालन करणाऱ्या कमांडरचे कार्यालय याच तळावर होते. हा हवाई तळ 1950 च्या दशकात तत्कालीन सोव्हिएत संघाने तयार केला होता. 1979 मध्ये जेव्हा सोव्हिएत संघाने अफगाणिस्तानवर हल्ला केला, तेव्हा हाच तळ त्यांच्या लष्कराचे प्रमुख केंद्र बनला.
शीतयुद्धाच्या काळात अफगाणिस्तानचे पंतप्रधान दाऊद खान यांनी अमेरिका दौरा केल्यानंतर 9 डिसेंबर 1959 रोजी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डी. आयसेनहॉवर हे बगराम हवाई तळावरच उतरले होते. त्यावेळी अफगाणिस्तानचे तत्कालीन राजे महंमद जहीर शाह यांनी अमेरिकी अध्यक्षांचे स्वागत केले होते.
त्यानंतर त्यांच्या वाहनांचा ताफा काबूलच्या दिशेने रवाना झाला होता. यादरम्यान अफगाणिस्तानातील लोक रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि आयसेनहॉवर यांचे मोठ्या उत्साहाने स्वागत करीत होते.
अमेरिकी सैनिक या तळावर आल्यानंतर तळाचा आकार वाढविण्यात आला होता, कारण लष्करी विमाने येथे उतरू शकतील, अशी तजवीज करायची होती. या हवाई तळाचा एक काळा इतिहासही आहे. या तळावरील वापरात नसलेल्या एका हॅंगरचे रूपांतर अमेरिकी सैनिकांनी डिटेन्शन सेंटरमध्ये केले होते.
पकडलेल्या दहशतवाद्यांचा तिथे वेगवेगळ्या प्रकारे छळ केला जात असे आणि त्यांच्याकडून माहिती काढून घेतली जात असे. 2002 मध्ये दोन जणांचा या छावणीत एवढा छळ केला गेला, की अखेर त्या दोघांचा मृत्यू झाला. एकाच वेळी या तळावर 3 हजार कैद्यांना ठेवले जात असे.
बगराम हवाई तळाच्या या व्यूहात्मक महत्त्वामुळे चीन त्यावर कब्जा करू इच्छित आहे, असे मत व्यक्त होत आहे. जर खरोखर असे घडले तर संपूर्ण अफगाणिस्तानात चीन आपली पकड मजबूत करू शकेल. चिनी लष्करासाठी विदेशात आणखी एक तळ बगराम तळाच्या रूपाने मिळू शकेल.
पुढील काळात अफगाणिस्तानातील नैसर्गिक संपदा लुटून चीनमध्ये घेऊन जाण्याचे चीनचे मनसुबे असू शकतात. अफगाणिस्तानात सुमारे एक लाख कोटी डॉलरचे सोने, तांबे, लीथियम आदी धातूंचे साठे आहेत. चीनला या संपदेवर कब्जा करायचा आहे. जर अफगाणिस्तान पुन्हा अशांत झाला, तर चीन या हवाई तळाचा वापर करून हिंसाचार दडपून टाकू शकतो.