अहमदनगर – रडायचे नाही तर हिमतीने लढायचे : कोल्हे

कोपरगाव – जीवनात कितीही अडचणी, संकटे आली तरी खचायचे नाही, घाबरायचे नाही, रडायचे नाही तर हिमतीने लढायचे आणि पुढे जायचे. माऊली, माता या शब्दात खूप मोठी ताकद आहे. स्त्री म्हणजे लक्ष्मी, सरस्वती, अन्नपूर्णा मातेचे रूप आहे. महिलांच्या चेहऱ्यावरील हास्य हीच माझी ऊर्जा आहे. तुमची साथ कायम माझ्या पाठीशी असू द्या, तुमच्या मदतीसाठी, तुमचे विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी मी सदैव तत्पर आहे, अशी ग्वाही माजी आ. स्नेहलता कोल्हे यांनी दिली.
संजीवनी महिला स्वयंसहाय्यता बचत गटातर्फे नवरात्रोत्सवानिमित्त तालुक्यातील करंजी येथे सन्मान नारी शक्तीचा होम मिनिस्टर-खेळ मानाच्या पैठणीचा’ या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. स्वत: स्नेहलताताई कोल्हे यांनी या कार्यक्रमात सहभागी होत मनमुराद आनंद लुटला.
कोल्हे म्हणाल्या, सन 2000 मध्ये मी महिला बचत गटापासून सामाजिक कार्य सुरू केले. महिला बचत गटाच्या माध्यमातून उंबऱ्याच्या आत अडकलेल्या माता-भगिनींना समाजाच्या प्रवाहात आणले, त्यांना उद्योग-व्यवसाय सुरू करण्यासाठी अर्थसाह्य करून स्वावलंबी बनवले. समाजकारण व राजकारण करताना महिलांचे प्रश्न सोडविण्यास मी सतत प्राधान्य दिले. आज महिला कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत. महिला काकणभर सरसच आहेत. ज्या घरात महिलांचा सन्मान होतो, तेच घर प्रगती करते. पुरुषांनी महिलांना सन्मानाची वागणूक दिली पाहिजे. पंतप्रधान नरेंद मोदी यांनी नारीशक्ती वंदन विधेयक मंजूर करून महिलांना लोकसभा व विधानसभांमध्ये 33 टक्के आरक्षण देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे.
यावेळी ज्योतीताई आगवन, छायाताई भिंगारे, मीनाक्षी भिंगारे, कुसुमताई आगवन, कल्पना भिंगारे, दीपाली भिंगारे, सुनीता भिंगारे, ईश्वरी भिंगारे, पूनम देसाई, अलकाताई भिंगारे, निर्मला फापाळे, विमलबाई भिंगारे, मनीषा शहाणे, गायत्री बोठे, सोनाली भिंगारे आदी उपस्थित होत्या.





