पुणे – सहायक प्राध्यापक पदांसाठी अनिवार्य असलेली राज्यस्तरीय पात्रता परीक्षा अर्थात सेट परीक्षा दि. 28 जूनला होत आहे. मात्र, करोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे सेट परीक्षा वेळेत होणार का, याविषयी उमेदवारांकडून साशंकता व्यक्त केली जात आहे. गोवा राज्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत सेट परीक्षा घेतली जाते.
विद्यापीठाच्या सेट विभागामार्फत यंदा येत्या 28 जूनला सेट परीक्षा घेतली जाणार आहे. सेट परीक्षेसाठी 1 लाख 11 हजार उमेदवारांनी अर्ज केले असून गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी अर्जाची संख्या 9 हजारांनी जास्त आहे. ही परीक्षा मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोवा या केंद्रांवर होणार आहे.
परंतु, करोनामुळे अनेक परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. विद्यापीठ व महाविद्यालयीन परीक्षा सुध्दा जुलै महिन्यात घेण्याचा विचार असून जून महिन्यात त्याबाबत पुन्हा आढावा घेतला जाणार आहे. त्यामुळे विद्यापीठातर्फे सुध्दा करोनामुळे निर्माण झालेली स्थिती विचारात घेऊन सेट परीक्षेबाबत निर्णय घेणार असल्याचे दिसून येत आहे.