मुंबई – भाजपचे नेते किरीट सोमय्या गेल्या काही दिवसांपासून गायब झाले होते. विक्रांत घोटाळ्यात मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व संरक्षण दिल्यानंतर किरीट सोमय्या आज मुंबई विमानतळावर दाखल झाले. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारला इशारा दिला. तसेच पत्रकारांनी कुठे गेला होतात विचारल्यानंतर ते म्हणाले, काही वेळेला होमवर्क करण्यासाठी नॉट रिचेबल व्हावं लागत असल्याचे त्यांनी सांगितले. किरीट सोमय्या म्हणाले, महाविकास आघाडीतील शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादीला सूट द्यावी, जेणेकरून आणखी खोल खड्डा त्यांनी खणावा. वर्तमानपत्रात बातमी आली म्हणून एफआयआर लिहायची, अजून ही तर सुरुवात आहे. न्याय मिळण्याची सुरुवात झाली आहे. मी होमवर्क केलेला आहे. हसन मुश्रीफ, अनिल परब, यशवंत जाधव आणि त्याच बरोबर नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या किती कंपन्यांतून उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, श्रीधर पाटणकर, तेजस ठाकरे किती मनी लॉंड्रिंग केले आहे, याचा हिशेब उद्धव ठाकरे यांना द्यावा लागेल, असे त्यांनी सांगितले. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचा मी आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. फक्त दिलासा दिलाय एवढं नाही. पण त्यांनी जे प्रश्नचिन्ह उपस्थित केले, तोच प्रश्न मी आठ दिवस उद्धव ठाकरे यांना विचारत आहे. सीएमओचे काम फक्त माफियागिरी करायला लावायची, खोटा एफआयआर करायला लावायची, अटक करून जेलमध्ये टाकण्याची भाषा वापरायची. हे महाराष्ट्र पहिल्यांदा अनुभवत आहे. विक्रांतमध्ये एक दमडीचा घोटाळा आम्ही केलेला नाही. 58 कोटींची भाषा संजय राऊतने वापरली होती. आठवा आरोप आणि आठही आरोपातील एकामध्येही कागद नाही, पुरावा नाही. फक्त स्टंटबाजी करायची. दोन-पाच दिवस मीडिया अटेन्शन मिळवायचे. न्यायालयावर मला विश्वास आहे. न्याय मिळायची सुरुवात झाली आहे, असही सोमय्या म्हणाले.