स्मार्ट सिटीतही ‘ती’ नकोशीच

तीन वर्षांत मुलींच्या जन्माचे प्रमाण सरासरी नऊशे : वैद्यकीय विभागाची आकडेवारी

– प्रकाश गायकर

पिंपरी – शहरात गर्भलिंग चाचणी करणाऱ्याविरोधातील कठोर कारवाई थंडावली आहे. मागील तीन वर्षांपासून मुलींचा जन्मदर झपाट्याने घटला असल्याचे महापालिकेतील आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. सन 2016 साली मुलींच्या जन्माचे प्रमाण एक हजार मुलांमागे 930 होते. तर 2019 मध्ये हे प्रमाण 907 इतके कमी झाले आहे.

बेटी बचाओ, बेटी पढाओ यासारख्या घोषणा देऊन मुलींच्या जन्माचे स्वागत होत असतानाच समोर आलेली आकडेवारी चिंताजनक आहे. वैद्यकिय विभागाच्या वतीने दर महिन्याला शून्य ते सहा वर्ष वयोगटातील मुला-मुलींच्या जन्माची आकडेवारी संकलित केली जाते. त्यानंतर ही आकडेवारी शासनाकडे पाठवली जाते.

आरोग्य विभागाकडील आकडेवारीनुसार शहरात मुलींच्या जन्मदराचे प्रमाण वर्षांगणिक कमी होताना दिसत आहे. सन 2016 मध्ये 14 हजार 483 मुलांचा जन्म झाला. याप्रमाणात मुलींची संख्या 13 हजार 474 होती. म्हणजेच मुलींच्या जन्माचे प्रमाण 930 होते. सन 2017 मध्ये मुलांचे प्रमाण 14 हजार 782 होते. तुलनेत मुलींचे प्रमाण 13 हजार 556 होते. म्हणजे मुलींचे प्रमाण कमी होऊन 917 झाले. सन 2018 मध्ये यामध्ये अधिकच घट झाली. 14 हजार 413 मुलांच्या जन्मामागे केवळ 12 हजार 755 मुलींचा जन्म झाला. म्हणजेच हे प्रमाण 885 इतके खाली आले. त्यानंतर 2019 मध्ये यामध्ये वाढ झाली असली तरी ते प्रमाण समाधानकारक नाही. या वर्षात 11 हजार 431 मुलांचा जन्म झाला, त्याप्रमाणात 10 हजार 367 मुलींचा जन्म होऊन मुलींच्या जन्मदराचे प्रमाण 907 वर पोहचले.

शहरामध्ये अनेक ठिकाणी गर्भलिंग चाचणी करून दिली जाते. यावर पोलीस व प्रशासनाचा अंकुश नसल्याने हे प्रकार वाढत आहेत. त्याबरोबरच आजही जुन्या रुढी-परंपरा सोडण्यास नागरिक तयार होत नाही. आजही अनेक कुटुंबांमध्ये वंशाला दिवा पाहिजे ही मानसिकता तग धरून आहे. त्यासाठी गर्भलिंग चाचणी केली जाते. छुप्या पद्धतीने अनेक ठिकाणी गर्भलिंग चाचणी करून गर्भपात करून दिले जातात. मात्र स्मार्ट सिटी होऊ घातलेल्या शहरातील शिक्षित नागरिकांमध्येही अशाप्रकारची मानसिकता असणे चिंताजनक आहे.

कायद्याचा धाक नाही
शहरात अनेक ठिकाणी सरकारमान्य गर्भपात केंद्र असे फलक लावलेले दिसतात. हे केंद्र खरच सरकारमान्य आहे का याची कोणताही नागरिक शहानिशा करण्यासाठी जात नाही. तसेच ज्यांना अशाप्रकारे गर्भलिंग चाचणी करायची आहे त्यांच्यासाठी ही एक चांगली सोय असते. अनेक खासगी रुग्णालयांमध्ये येथे गर्भलिंग चाचणी केली जात नाही असे फलक लावलेले असले तरी छुप्या पद्धतीने चाचण्या केल्या जातात का? हे पाहण्यासाठी प्रशासनाची कोणतीही यंत्रणा नाही. अनेक शहरातील महापालिका क्षेत्रांमध्ये सायलेंट ऑब्झर्व्हर च्या माध्यमातून पाहणी केली जाते. अशा प्रकारे छुप्या पद्धतीने चाचणी करताना आढळले तर कारवाई केली जाते. त्यामुळे कारवाईला घाबरून रुग्णालय प्रशासन वा नागरिक अशा चाचण्यांकडे वळत नाही. मात्र आपल्या शहरामध्ये याचा अभाव आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)