PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोमवारी नॉर्वेचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट’ प्रदान करण्यात आला. नॉर्वेचे राजे हॅराल्ड (पाचवे) यांनी हा सन्मान मोदी यांना बहाल केला. नॉर्वेशी संबंध दृढ करण्यासाठी तसेच आंतरराष्ट्रीय समुदायाप्रती दिलेल्या असामान्य योगदानाबद्दल हा सन्मान देण्यात येतो. या पुरस्काराचा ‘ग्रँड क्रॉस’ हा सर्वोच्च दर्जा असून तो अत्यंत विशेष व्यक्तींनाच बहाल केला जातो. या सन्मानासह, पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात मोदी यांना आतापर्यंत विविध देशांकडून एकूण ३२ आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ‘रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट’ची स्थापना राजे ओलाव (पाचवे) यांनी १९८५ मध्ये केली होती. नॉर्वेजियन नागरिकांसह परदेशी नागरिकांनाही हा सन्मान प्रदान केला जातो. हेही वाचा – डॉलरच्या तुलनेत रुपया विक्रमी नीचांकी 96.35 वर; महागाई वाढीची शक्यता उल्लेखनीय म्हणजे, याच दौऱ्यादरम्यान स्वीडनने मोदींना ‘रॉयल ऑर्डर ऑफ पोलार स्टार कमांडर ग्रँड क्रॉस’ हा त्या देशाचा सर्वोच्च सन्मान प्रदान केला होता. पंतप्रधान मोदी हे सध्या संयुक्त अरब अमिराती, नेदरलँड्स, स्वीडन आणि नॉर्वे या देशांचा दौरा पूर्ण करून १५ ते २० मे दरम्यानच्या पाच देशांच्या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात इटलीला रवाना होणार आहेत. नॉर्वे भेटीदरम्यान ते तिसऱ्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेतही सहभागी झाले.