Norway Chess 2024 : कार्लसननं पटकावले जेतेपद, नाकामुराला हरवून प्रज्ञानंद तिसऱ्या स्थानी…

Norway Chess 2024 : – भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीत अमेरिकेच्या हिकारू नाकामुराला पराभूत करून तिसरे स्थान मिळवून आपल्या मोहिमेचा सकारात्मक शेवट केला, तर जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेल्या मॅग्नस कार्लसनने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
कार्लसनने 17.5 गुणांसह आपली मोहीम संपवली. त्याला अंदाजे 65,000 डॉलर्सची बक्षीस रक्कम मिळाली. त्याने शास्त्रीय वेळ नियंत्रण आणि आर्मगेडन या दोन्ही फेऱ्यांत विजय मिळवला. अंतिम फेरीत पराभूत होऊनही, नाकामुरा 15.5 गुणांसह दुसऱ्या स्थानावर राहिला तर प्रग्नानंद 14.5 गुणांसह तिसऱ्या स्थानावर राहिला.
या स्पर्धेत प्रज्ञानंदसाठी जगातील अव्वल तीन खेळाडूंना पराभूत करणे ही दिलासादायक बाब होती. त्याने शास्त्रीय वेळेच्या नियंत्रणामध्ये कार्लसन आणि फॅबियानो कारुआना यांचा पराभव केला आणि आता नाकामुराविरुद्धच्या त्याच्या विजयामुळे तो पहिल्या तीन खेळाडूंना पराभूत करणारा पहिला खेळाडू ठरला आहे.

