उत्तर कोरियाने अमेरिकेपर्यंत मारा करू शकणाऱ्या घातक क्षेपणास्त्राची घेतली चाचणी

सेऊल , (दक्षिण कोरिया) – उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांनी आपल्या देशाची आण्विक शक्ती अधिक वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. थेट अमेरिकेच्या मुख्य भूमीपर्यंत मारा करू शकणाऱ्या लांब पल्ल्याच्या आंतरखंडीत क्षेपणास्त्राची उत्तर कोरियाने बुधवारी चाचणी घेतली. उत्तर कोरियाच्या सरकारी प्रसिद्धी माध्यमांनी आज याची माहिती दिली. अमेरिकेने दक्षिण कोरियाबरोबरचे आपले संरक्षण संबंध वाढवल्यामुळे आपल्या क्षेपणास्त्रांच्या चाचण्या पुन्हा एकदा वाढवण्यात येणार असल्याचे किम जोंग यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.
देशाच्या आण्विक धोरणाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. संरक्षणाच्या मुद्यावर आणि उत्तर कोरियाच्या धोरणांबाबत नियमित प्रगती सुरूच राहिल. अधिक घातक, परिणामकारक आणि भरवशाची अण्वस्त्रे विकसित केली जाणे सुरू राहिल, असेही उत्र कोरियाच्या वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
कोरियाच्या द्विपसमुहामध्ये प्रतिस्पर्धी देशांकडून सुरू असलेल्या कारवायांमुळे निर्माण झालेल्या वातावरणामुळे उत्तर कोरियाला घातक शस्त्रे निर्माण करणे भाग पडते आहे, असेही किम यांनी म्हटले आहे.
आतापर्यंतचे सर्वात घातक क्षेपणास्त्र
उत्तर कोरियाने हवांगसोंग 18 या क्षेपणास्त्राची एप्रिलमध्ये चाचणी घेतली होती. हे क्षेपणास्त्र अण्वस्त्रधारी देशांमधील सर्वात ताकदवान क्षेपणास्त्र असल्याचे किम म्हणाले होते. द्रवरुप इंधनाऐवजी घन इंधनावर चालणारे हे क्षेपणास्त्र शेजारीत देशांच्या हवाई कक्षेला टाळण्याइतके उंच सोडण्यात आले होते. या क्षेपणास्त्राने 74 मिनिटात 6,648 किलोमीटर उंचीवरून 1,001 किलोमीटरचा प्रवास केला होता. त्यानंतर हे क्षेपणास्त्र उत्तर कोरियाच्या किनाऱ्याजवळ समुद्रात कोसळले. हे क्षेपणास्त्र अमेरिकेच्या मुख्य भूमीपर्यंत पोचू शकणार आहे.





