अनिवासी भारतीय व्यावसायिक थंपी यांना ईडीकडून अटक

रॉबर्ट वढेरा यांच्याशी संबंधित प्रकरणात कारवाई
नवी दिल्ली : अनिवासी भारतीय व्यावसायिक सी.सी.थंपी यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांच्याशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणी ती कारवाई करण्यात आली. ईडीच्या जाळ्यात आलेल्या थंपी यांची दुबईत स्काय लाईट नावाची कंपनी आहे.
त्या कंपनीने सध्या फरार असलेला शस्त्रास्त्र विक्रेता संजय भंडारी याच्या कंपनीकडून लंडनमध्ये एक फ्लॅट विकत घेतला. तो फ्लॅट नंतर वढेरा यांना विकण्यात आल्याचा आरोप आहे. त्यावरून वढेरा आणि भंडारी यांच्याविरोधात परदेशात मालमत्तेचा अवैध व्यवहार केल्याच्या आरोपावरून मनी लॉण्डरिंगची चौकशी सुरू आहे.
त्या प्रकरणात याआधी चौकशीला सामोऱ्या गेलेल्या थंपी यांनी लंडनमधील फ्लॅटमध्ये वढेरा राहिले होते, असा दावा केला होता. मात्र, तो दावा वढेरा यांनी फेटाळून लावला होता. चौकशीचा भाग म्हणून थंपी यांना नुकतेच समन्स बजावण्यात आले.
चौकशीसाठी हजर राहिल्यानंतर थंपी यांना अलिकडेच अटक करण्यात आली. काही राजकारणी आणि नोकरशहांशी व्यवहार केल्यावरूनही थंपी ईडीच्या रडारवर असल्याचे समजते.





