मदुराई – येथील सुप्रसिद्ध श्री मीनाक्षी सुंदरेश्वर या दोन मंदिर समूहात प्रथमच पी. महाराजन आणि एस. अरुणकुमार या दोन ब्राह्मणेतर व्यक्तींची पुजारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तमीळनाडू सरकारतर्फे राबवण्यात येणाऱ्या अन्नाईवरूम अर्चगार अगलम् कार्यक्रमाअंतर्गत या दोघांची नेमणूक करण्यात आलेली आहे. ( Non-Brahmin priests in the temple of Mudurai )
या मंदिर समूहाचे सहाय्यक आयुक्त के चेल्लादुराई यांनी सांगितले की, महाराजन यांची अमूर अय्यम ईस्वरर मंदिरात तर अरुणकुमार यांची अरुलमिगू थेराडी करुप्पासामी मंदिरात नेमणूक करण्यात आलेली आहे. श्री मीनाक्षी अम्मा मंदिरातर्फे हिंदू रिलीजियस अँड चॅरिटेबल एन्डॉवमेंट्स खात्याच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत दोघांनी सर्वाधिक गुण प्राप्त केले आहेत.
याआधी ऑगस्ट 2018 मध्ये मोचीकुलम येथील टी. मरिचामी यांची मदुराईतील अय्यप्पन मंदिरात पुजारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तमीळनाडूतील ब्राह्मणेतर जातीतील ते पहिले पुजारी ठरले आहेत. त्यांनी देखील राज्य सरकारच्या अर्चक (पुजारी) प्रशिक्षण केंद्रात शिक्षण घेतले आहे. 2007-08 मध्ये राज्यातील विविध जातींच्या 206 व्यक्तींना पुजारी म्हणून प्रशिक्षण देण्यात आले होते. या केंद्रातून पुजाऱ्यांची पहिली तुकडी बाहेर पडल्यानंतर
हा प्रशिक्षण कार्यक्रमच बंद करण्यात आला. ( Non-Brahmin priests in the temple of Mudurai )
मात्र 206 पैकी मरिचामी यांनी दहा वर्षानंतर पुजारीपद मिळाले आणि इतिहास घडला. त्यानंतर दोन वर्षांनी आणखी दोघा ब्राह्मणेतरांची पुजारी म्हणून नेमणूक करण्यात आली.
मात्र, अण्णाद्रमुक सरकारच्या काळात हिंदू संघटनांकडून प्रतिक्रिया येण्याच्या भितीने या नेमणुका जाहीर करण्यात आल्या नाहीत. त्यानंतर आता आणखी दोघाना संधी मिळालेली आहे. आता 14 ऑगस्ट रोजी झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी आणखी 54 ब्राह्मणेतरांची अर्चकार (पुजारी) म्हणून नेमणूक केली आहे. त्यापैकी दोघांना मदुराईच्या मंदिरात नियुक्ती मिळालेली आहे.