Nobel Peace Prize 2025: डोनाल्ड ट्रम्प यांचे स्वप्न भंगले, नाही मिळाला नोबेल पुरस्कार, व्हाईट हाऊसने दिले ‘हे’ उत्तर

Nobel Peace Prize 2025: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नोबेल शांतता पुरस्कार मिळवण्याचे स्वप्न यंदा धुळीला मिळाले आहे. यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार व्हेनेझुएलाच्या लोकशाहीवादी नेत्या मारिया कोरिना मचाडो यांना जाहीर झाला आहे. यानंतर व्हाईट हाऊसने या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, नोबेल समितीवर राजकारणाला प्राधान्य देण्याचा आरोप केला आहे.
व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प युद्ध संपवण्यासाठी, शांतता करार घडवून आणण्यासाठी आणि मानवी जीव वाचवण्यासाठी आपले प्रयत्न अखंडपणे सुरू ठेवतील. व्हाईट हाऊसचे संप्रेषण संचालक स्टीव्हन चुइंग यांनी सोशल मीडिया मंच ‘एक्स’वर एका पोस्टद्वारे नोबेल समितीवर टीका केली. ते म्हणाले, “नोबेल समितीने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या शांततेसाठीच्या प्रयत्नांकडे दुर्लक्ष केले आहे. तरीही, ट्रम्प युद्ध संपवण्यासाठी आणि मानवतेची सेवा करण्यासाठी आपले कार्य सुरू ठेवतील. त्यांच्यासारखा दृढनिश्चयी आणि मानवतावादी व्यक्तिमत्त्व दुसरे कोणीही नाही.”
ट्रम्प यांची अद्याप प्रतिक्रिया नाही –
नोबेल शांतता पुरस्कारासाठी ट्रम्प यांनी जोरदार मोहीम राबवली होती. याच आठवड्यात त्यांनी गाझामधील युद्ध संपवण्यासाठी युद्धविराम आणि ओलिस ठेवलेल्यांच्या सुटकेचा करार जाहीर केला होता. मात्र, नोबेल समितीच्या निर्णयावर ट्रम्प यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. शुक्रवारी सकाळी त्यांनी आपल्या ‘ट्रुथ सोशल’ खात्यावर तीन व्हिडिओ पोस्ट केले, ज्यात त्यांच्या समर्थकांना गाझा कराराचा उत्सव साजरा करताना दाखवण्यात आले आहे. सूत्रांनुसार, ट्रम्प लवकरच याबाबत आपली प्रतिक्रिया देण्याची शक्यता आहे.
नोबेल समितीवर राजकारणाचा आरोप –
व्हाईट हाऊसने नोबेल समितीवर शांततेपेक्षा राजकारणाला महत्त्व दिल्याचा आरोप केला आहे. ट्रम्प यांच्या शांततापूर्ण प्रयत्नांना नजरअंदाज करून समितीने चुकीचा निर्णय घेतल्याचे व्हाईट हाऊसचे म्हणणे आहे. यंदाच्या नोबेल शांतता पुरस्काराच्या निर्णयाने ट्रम्प समर्थकांमध्येही नाराजी पसरली आहे.





