Mumbai High Court : हॉटेलमध्ये कोळसा, लाकूडचा वापर नको; मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने प्रदूषण रोखण्यासाठी दिलेल्या आदेशांनुसार मुंबईत तंदुरी चिकन, रोटी, अन्न पदार्थ बनविण्यासाठी इंधन म्हणून कोळसा, लाकूड फर्निचर यांचा वापर करण्यास नोटिसा बजावत मनाई करण्यात आली आहे. संबंधित हॉटेल्स, बेकऱ्या चालकांनी 8 जुलै 2025 पर्यंत पर्यायी इंधन म्हणून इलेक्ट्रिक शेगडी, हरित इंधनाचा (जसे की, सीएनजी, पीएनजी इत्यादी) वापर करण्याबाबत पर्याय देण्यात आला आहे.
मात्र 8 जुलैपर्यंत पर्यायी उपाययोजना न केल्यास आणि कोळसा, लाकूड यांचा जळाऊ इंधन वापरल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिकेतर्फे देण्यात आला आहे. मुंबईत गेल्या काही महिन्यांपासून हवेतील प्रदूषण वाढले होते. त्यामुळे त्याची गंभीर दखल घेत न्यायलयाने आणि प्रदुषण नियंत्रण मंडळाने मुंबई महापालिकेवर चांगलीच तोफ डागत कान उपटले.
उच्च न्यायालयाने 9 जानेवारी 2025 रोजी घेतलेल्या सुनावणीत 6 महिन्यांच्या मुदतीत लाकूड व कोळसा इंधन आधारीत व्यावसायिकांनी पर्यायी स्वच्छ इंधनाचा अवलंब करण्याचे आदेश दिले. त्यामुळे खडबडून जागृत झालेल्या महापालिका प्रशासनाने प्रदूषण रोखण्यासाठी 28 नियम लागू केले. त्यानंतर पुन्हा त्यामध्ये आणखीन एका नियमाची भर घातली.
तसेच, डेब्रिज आणि इमारत बांधकामांचे होणारे हवेतील प्रदूषण रोखण्यासाठी संबंधितांवर कारवाईचा बडगा उगारला. त्यामुळे काही प्रमाणात प्रदूषण कमी झाले. मात्र अद्यापही बेकरी, हॉटेल्स, ढाबे आदी ठिकाणी तंदुरी चिकन, रोटी बनविण्यासाठी लाकूड, कोळसा यांचा वापर करण्यात येत असल्याने त्यामुळेही हवेतील प्रदूषणात भर पडत असल्याचे पालिकेच्या निदर्शनास आले. त्यामुळे महापालिकेने या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी पर्यायी हरित इंधनाचा वापर करण्यास सांगितले आहे.





