Fuel Supply: देशभरातील पेट्रोल, डिझेल किंवा एलपीजीच्या साठ्याबाबत केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती
Fuel Supply: राजधानी दिल्लीत आयोजित आंतर-मंत्रालयीन पत्रकार परिषदेत मंत्रालयाच्या संयुक्त सचिव (मार्केटिंग व ऑइल रिफायनरी) सुजाता शर्मा यांनी सांगितले की, जागतिक ऊर्जा पुरवठा साखळीत अडथळे निर्माण झाले असले तरी सामान्य ग्राहकांना कमीत कमी अडचण होईल, यासाठी केंद्र सरकारने प्रभावी उपाययोजना केल्या आहेत.

Fuel Supply: जागतिक ऊर्जा पुरवठा साखळीत निर्माण झालेल्या व्यत्यय आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीतील तीव्र चढ-उताराच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सोमवारी देशभरात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा कोणताही तुटवडा नसल्याचे स्पष्ट केले. कच्च्या तेलाचा साठा स्थिर असून रिफायनऱ्या पूर्ण क्षमतेने कार्यरत असल्याची माहिती पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने दिली.
राजधानी दिल्लीत आयोजित आंतर-मंत्रालयीन पत्रकार परिषदेत मंत्रालयाच्या संयुक्त सचिव (मार्केटिंग व ऑइल रिफायनरी) सुजाता शर्मा यांनी सांगितले की, जागतिक ऊर्जा पुरवठा साखळीत अडथळे निर्माण झाले असले तरी सामान्य ग्राहकांना कमीत कमी अडचण होईल, यासाठी केंद्र सरकारने प्रभावी उपाययोजना केल्या आहेत.
Our refineries are operating at optimal levels. There is no dry-out reported at any retail outlet. LPG distributorships are also functioning smoothly, with no dry-out being reported. Sufficient stocks of petrol and diesel are available, and #LPG is being supplied for domestic… pic.twitter.com/IAQIKexIKo
— PIB India (@PIB_India) May 11, 2026
“देशातील कच्च्या तेलाचा साठा सुस्थितीत आहे. सर्व रिफायनऱ्या सर्वोत्तम क्षमतेने सुरू आहेत. देशातील कोणत्याही पेट्रोल पंपावर इंधन तुटवड्याची परिस्थिती निर्माण झालेली नाही. तसेच एलपीजी वितरकांकडेही तुटवड्याच्या तक्रारी आलेल्या नाहीत,” असे शर्मा यांनी स्पष्ट केले.
गेल्या तीन दिवसांत १.१४ कोटी एलपीजी बुकिंगच्या तुलनेत १.२६ कोटी सिलिंडर ग्राहकांना वितरित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. याशिवाय व्यावसायिक एलपीजीची विक्री १७ हजार टनांहून अधिक झाली असून ऑटो एलपीजीची विक्री ७६२ टनांपेक्षा जास्त नोंदविण्यात आली आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सिकंदराबाद येथील कार्यक्रमात नागरिकांना इंधन बचतीचे आवाहन केले होते. त्यानुसार पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करणे, शक्य तेथे मेट्रो व सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणे, कारपूलिंगला प्राधान्य देणे, मालवाहतुकीसाठी रेल्वेचा वापर वाढविणे आणि इलेक्ट्रिक वाहनांचा अधिक स्वीकार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले होते.
याच अनुषंगाने सुजाता शर्मा यांनीही नागरिकांना ऊर्जा बचतीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. “देशावरील आर्थिक भार कमी करण्यासाठी प्रत्येकाने दैनंदिन जीवनात ऊर्जा बचतीचे उपाय अमलात आणणे गरजेचे आहे,” असे त्या म्हणाल्या.
पंतप्रधान मोदी यांनी नागरिकांना एका वर्षासाठी अनावश्यक परदेश प्रवास टाळण्याचे, स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देण्याचे, खाद्यतेलाचा वापर कमी करण्याचे तसेच नैसर्गिक शेतीकडे वळण्याचेही आवाहन केले आहे. रासायनिक खतांच्या आयातीवर मोठ्या प्रमाणात परकीय चलन खर्च होत असल्याने त्याचा वापर कमी करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.





