आयात शुल्काबाबत माघार घेणार का? डोनाल्ड ट्रम्प स्पष्टच म्हणाले, ‘हे म्हणजे…’

वॉशिंग्टन – अमेरिकेने लादलेल्या वाढीव आयात शुल्काचा परिणाम म्हणून जगभरातील बाजारपेठेमध्ये घसरणीचे सत्र सुरू असतानाच ट्रम्प यांनी मात्र आपण आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे. जागतिक व्यापार समतोल करण्यासाठी आणि देशांतर्गत उत्पादन क्षेत्राची फेरउभारणी करण्यासाठी आपले वाढीव आयात शुल्क आवश्यक आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
आपल्या सर्वांच्या व्यापाराचा सर्वाधिक गैरवापर चीनकडूनच केला जातो, असेही ट्रम्प म्हणाले. तसेच चीनकडून अमेरिकेवर वाढीव आयात शुल्क लावले जाण्यावरही त्यांनी टीका केली.
अल्बामा येथे रिपब्लिकन पक्षाच्या मेळाव्यामध्ये ट्रम्प बोलत होते. वाढीव आयात शुल्क लागू केल्याचा आनंदोत्सव अल्बामा प्रांतातल्या रिपब्लिकन नेत्यांकडून साजरा केला गेला. हा ट्रम्प यांचा आणि त्यांच्या अमेरिका प्रथम या धोरणाचा विजय असल्याची प्रतिक्रिया अल्बामातील रिपब्लिकन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जॉन वाहल यांनी यावेळी दिली.
आपण वाढीव आयात शुल्काच्या मुद्द्यावर माघार घेणार नाही, असे ट्रम्प यांनी ठामपणे म्हटले आहे. हे वाढीव आयात शुल्क म्हणजे औषध आहे. जगभरातील बाजारपेठेत पडझड व्हावी, असे आपल्याला वाटत नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याने आपल्याला चिंता वाटत नाही, असेही नाही. काही वेळा आजार दूर करण्यासाठी आपल्याला औषध घ्यावे लागतेच, असेही ट्रम्प म्हणाले. काही कालावधीनंतर वाढीव आयात शुल्क किती योग्य आहे, हे सर्वांच्या लक्षात येईल, असेही त्यांनी सांगितले.
तेलाच्या किमती कमी झाल्या आहेत, व्याजदर कमी झाले आहेत. अन्नधान्याच्या किमती कमी झाल्या आहेत, चलनवाढ नाही आणि दीर्घकाळापासून गैरवापर करणारी अमेरिका आधीच लागू असलेल्या शुल्कांवर गैरवापर करणाऱ्या देशांकडून दर आठवड्याला अब्जावधी डॉलर्स आणत आहे, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
ट्रम्प यांनी भूतकाळातील नेत्यांना इतर देशांकडून अमेरिकेचा दुरुपयोग होऊ दिल्याबद्दल दोषी ठरवले. यापूर्वी, त्यांनी माजी अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यावर टीका केली होती आणि त्यांच्यावर चीन, युरोपियन युनियन आणि इतर देशांसोबत अमेरिकेला आर्थिक तूट सहन करू दिल्याचा आरोप केला होता.





