पुणे – प्रभात रस्ता आणि कोथरूड परिसरात वाहनांची अधिक रहदारी असते. वाहतूक पोलिसांची कारवाई होऊ नये, यासाठी अनेक वाहनचालक प्रभात रस्त्यावरील लहान रस्त्यांवर वाहने उभी करतात. पर्यायाने या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. या कोंडीवर उपाय काढण्यासाठी वाहतूक शाखेने या परिसरातील रस्त्यांवर “नो-पार्किंग’ जाहीर केले आहे.
डेक्कन वाहतूक विभागांतर्गत प्रभात रोड लेन क्रमांक 7 मध्ये रोहिणी भाटे चौक ते राठी बंगला (भांडारकर रोड) येथील रस्त्याच्या डाव्या बाजूने “नो-पार्किंग’ करण्यात आले आहे. यासह रोहिणी भाटे चौक ते अभ्युदय अपार्टमेंट भांडारकर रोड येथे संपूर्ण रस्त्यावर समांतर पार्किंग करण्यात आले आहे. तर याच रस्त्याच्या उजव्या बाजूचे सर्व कॉर्नरवर नो-पार्किंग करण्यात येणार आहे.
कोथरूडच्या वाहतूक विभागांतर्गत डीपी रस्त्यावरील म्हात्रे पूल ते पंडीत फार्मदरम्यान दोन्ही बाजूला “नो-पार्किंग’ करण्यात येणार आहे. डीपी रस्त्याच्या दोन्ही बाजूने मंगल कार्यालये आणि हॉटेल्स आहेत. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चारचाकी आणि दुचाकी वाहने उभी केली जातात. परिणामी, या भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.