मुंबई : महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आल्याचे पहायला मिळत आहे. लोकसभेला इंडिया आघाडीतील २० पक्ष एकत्र आले होते, तेव्हाही आम्ही घाबरलो नाही. कितीही लोक एकत्र येऊद्या, आम्हीच जिंकणार आहोत, असा विश्वास महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे बंधूंच्या युतीबाबत बोलताना व्यक्त केला आहे. मोठे लोक एकत्र आल्याने कधीच निवडणुका जिंकल्या जात नाहीत, म्हणून त्यात काहीही संभ्रम नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. बावनकुळे म्हणाले, मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसने नवाब मलिकांना जबाबदारी दिल्यानंतर आमची नाराजी नाही. तो त्यांच्या पक्षाचा निर्णय ते घेतील. त्यामुळे नवाब मलिक यांच्या निवडीच्या निर्णयावर आमचा बोलण्याचा अधिकार नाही. आमची नाराजी नाही, निश्चितच आम्ही मैत्रीपूर्ण लढणार असल्याचे ते म्हणाले. नांदेडमध्ये मतदारांना कोंडल्याचा आरोप करण्यात येत आहे. यावरती बोलताना बावनकुळे म्हणाले, निवडणुकीत आरोप काहीही होतात. विरोधक निवडणूक हरतात, तेव्हाच असे आरोप केले जातात. झालेल्या आरोपांची निवडणूक आयोग आणि पोलीस चौकशी करतील, असे ते म्हणाले. राज्यात भाजप आणि शिंदेसेनेची चांगली महायुती होईल. जिथे अजित पवार आमच्याशी चर्चा करतील तिथे ते आमच्या सोबत येणार असल्याचे बावनकुळे म्हणाले.