Pimpri : शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय भूसंपादन नाही : डॉ. योगेश म्हसे

हिंजवडी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) हद्दीतील प्रस्तावित ६५ मीटर रुंद रिंगरोडसाठी टीपी स्कीमच्या माध्यमातून सुनियोजित शहर उभारले जाणार आहे. मात्र कुठल्याही शेतकऱ्यांचे भूसंपादन त्यांच्या शंका व अडचणींचे निरसन आणि संमतीशिवाय होणार नाही, अशी ग्वाही पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी दिली.
धामणे, गोदुंबरे, दारुंबरे, साळुंब्रे व सांगवडे गावांतील शेतकऱ्यांसोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार सुनील शेळके, अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला, संचालक अविनाश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
“या योजनेमुळे वाहतूक कोंडी कमी होईल, अपेक्षित सुविधा निर्माण होतील व शेतकऱ्यांनाही दीर्घकालीन फायदा मिळेल,” असे डॉ. म्हसे म्हणाले. तर आमदार शेळके यांनी “शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्या आणि त्यांना योग्य मोबदला मिळवून द्या” अशी सूचना प्रशासनाला केली.





