वेटिंग तिकीट असल्यास स्टेशनवर प्रवेश मिळणार नाही; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची संसदेत माहिती

Ashwini Vaishnav | केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी संसदेत रेल्वे स्थानकांवर गर्दीचे व्यवस्थापन सुधारण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली असल्याची माहिती दिली आहे. यामध्ये रुंद फूट ओव्हरब्रिज, सीसीटीव्ही आणि वॉर रूमची व्यवस्था करण्यात आल्याचे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीत 18 जणांचा मृत्यू झाला होता. यासारखी घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी आता महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
त्यानुसार, सण आणि यात्रांमध्ये होणारी प्रचंड गर्दी नियंत्रित करण्यासाठी रेल्वेने मर्यादित प्रवेश नियंत्रण प्रणाली लागू केली आहे. या प्रणालीनुसार स्थानकांच्या बाहेर होल्डिंग एरिया तयार केले गेले आहेत. त्याद्वारे ट्रेन प्लॅटफॉर्मवर येईपर्यंत प्रवाशांना प्रवेश दिला जाणार नाही, असंही अश्विनी वैष्णव म्हणाले.
होल्डिंग एरिया तयार केले जाणार
२०२४ च्या सणासुदीच्या काळात सुरत, उधना, पाटणा आणि नवी दिल्ली येथे होल्डिंग एरिया तयार करण्यात आले होते. महाकुंभ दरम्यान, प्रयागराजच्या नऊ स्थानकांवरही ही प्रणाली लागू करण्यात आली होती. इथला प्रतिसाद पाहता देशभरातील ६० स्थानकांवर कायमस्वरूपी होल्डिंग एरिया तयार केले जाणार आहेत. Indian Railway |
कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच प्लॅटफॉर्मवर प्रवेश
केवळ कन्फर्म आरक्षित तिकीट असलेल्या प्रवाशांनाच प्लॅटफॉर्मवर प्रवेश मिळणार आहे. तर प्रतीक्षा यादीत आणि तिकीट नसलेल्या प्रवाशांना बाहेरील वेटिंग एरियामध्ये थांबावे लागेल. अनधिकृत एंट्री पॉइंटही सील केले जातील. तसेच वृद्ध, निरक्षर आणि महिला प्रवाशांना मदत करण्यासाठीच प्लॅटफॉर्म तिकीट जारी केले जातील, अशी माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली.
सीसीटीव्ही कॅमेर्यांची संख्या वाढवणार
याशिवाय सर्व प्रमुख स्थानकांवर देखरेख ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेर्यांची संख्या वाढविली जाईल. मोठ्या रेल्वे स्थानकांवर वॉर रूम स्थापन केल्या जातील. जेथे सर्व विभागांचे अधिकारी गर्दीच्या बाबतीत समन्वयाने काम करतील. गर्दी असलेल्या स्थानकांवर वॉकी-टॉकी, घोषणा प्रणाली आणि डिजिटल संचार उपकरणे स्थापित केली जातील. Ashwini Vaishnav |
स्टेशनच्या क्षमतेनुसार आणि उपलब्ध गाड्यांनुसार तिकिटांच्या विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्टेशन संचालकांना सूचना दिल्या जातील. स्थानकांवर सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी जीआरपी, स्थानिक पोलिस आणि नागरी प्रशासनाचा समावेशही केला जाईल. Ashwini Vaishnav |
प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर नियंत्रण
नवी दिल्ली रेल्वे स्थानकात नुकत्याच झालेल्या चेंगराचेंगरीचा धडा घेत, रेल्वे झोनल अधिकाऱ्यांना प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. वृद्ध, अशिक्षित आणि महिला प्रवाशांना मदत करण्यासाठी काही विशिष्ट परिस्थितीत प्लॅटफॉर्मची तिकिटे जारी केले जातील.
हेही वाचा:





