Bachchu Kadu | प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या आघाडीत ‘एमआयएम’ला स्थान देण्यास नकार दिला आहे. ‘आमचा लढा शेतकरी, कष्टकरी आणि प्रत्येक जातीमधील गरीब घटकांसाठी असून, ‘एमआयएम’ची प्रखरता पचविणे आम्हाला सहज शक्य होणार नाही. त्यामुळे धार्मिक कटुता निर्माण करणाऱ्या कोणत्याही पक्षापासून अंतर राखू,’ असे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा आमदार बच्चू कडू यांनी स्पष्ट केले आहे. नाशिक दौऱ्यादरम्यान आमदार बच्चू कडू बुधवारी माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर देखील निशाणा साधला. “महाविकास आघाडी एकसंध नाही हे मुख्यमंत्रिपदावरून सुरू असलेल्या अंतर्गत कलहातून दिसून येते. दासाठी तुम्ही आहात की लोकांसाठी हे आधी ठरवा. तर आम्ही युतीबाबत महायुतीला प्रस्ताव दिला होता. परंतु, त्यांच्याकडून अजून उत्तर आलेले नाही, याचाच अर्थ त्यांना महायुतीत ठेवायचे नाही,” असेही ते म्हणाले. Bachchu Kadu राज्यात महाशक्ती निर्माण करू तिसऱ्या आघाडीमार्फत आम्ही राज्यात महाशक्ती निर्माण करू, असे सांगत ही शक्ती जनतेची शक्ती असेल. , ही महाशक्ती जनतेची राहील. महाशक्तीसंदर्भात आमची बैठक होत असून, यात राजू शेट्टी, संभाजीराजे छत्रपती, प्रकाश आंबेडकर यांचे चुलतबंधू राजदत्त आंबेडकर आणि इतर काही मुस्लिम संघटना सहभागी होणार आहे, असेही त्यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले, “या बैठकीमध्ये तिसऱ्या महाआघाडी संदर्भातील सर्व मुद्दे स्पष्ट होतील, हे मुद्दे घेऊनच आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. एमआयएम हा पक्ष तिसऱ्या आघाडीत येण्यासाठी इच्छुक आहे. मात्र या पक्षाची प्रखरता पचविणे आम्हाला व लोकांनाही सहज शक्य होणार नाही. आमचा मुद्दा हा धर्म व जातीच्या पलीकडे तसेच कष्टकरी शेतकरी यांचा आहे. धार्मिक कटुता निर्माण करणाऱ्या कोणत्याही पक्षापासून दूर राहण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असे यावेळी बच्चू कडू यांनी स्पष्ट केले. दोन उमेदवारांची घोषणा प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी नाशिकमधून विधानसभेसाठी 2 उमेदवारांची घोषणा केली. माजी मंत्री बच्चू कडू निफाडच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाकडून निफाड आणि चांदवड या दोन मतदारसंघांचे उमेदवार जाहीर असून निफाडमधून गुरुदेव कांदे तर चांदवडमधून गणेश निंबाळकर यांना प्रहारकडून उमेदवारी जाहीर करण्यात आल्याचे सांगितले. हेही वाचा: ‘तिरुपती मंदिराच्या प्रसादात प्राण्यांच्या चरबीचा वापर करण्यात आला’, सीएम नायडूंच्या दाव्याला रेड्डी सरकारचे सडेतोड उत्तर