मुंबई : मनसेनेते संदीप देशपांडे यांनी, राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मनसे हा स्वतंत्र पक्ष असून तो महाविकास आघाडीचा सदस्य नसल्याचे स्पष्ट करताना, राज ठाकरेच आमच्या पक्षाचे निर्णय घेतात, असे म्हटले होते. त्यानंतर कॉंग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेताना, कायदा मोडणाऱ्या किंवा धमकावणाऱ्यांशी कधीही हातमिळवणी करणार नाही, असे स्पष्ट केले. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये मनसेला सामावून घेण्यास कॉंग्रेसचा विरोध असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखीत झाले आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यामध्ये जवळीक वाढली असल्याने, काँग्रेसने अलिकडेच बीएमसीच्या निवडणूका स्वतंत्रपणे लढवण्याची घोषणा केली. वर्षा गायकवाड यांनी देखील आजच्या पत्रकार परिषदेत, कॉंग्रेसला कोणताही निर्णय घेण्याची घाई नसल्याचे स्पष्ट करताना विरोधी पक्षांनी एकत्र राहावे असे आवाहन केले. कॉंग्रेस पक्षातील नेते, वरिष्ठ कार्यकर्ते यांच्याशी सल्लामसलत करुनच आघाडी संदर्भातील निर्णय घेणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. कॉंग्रेस व शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यातील दिर्घकालीन संबंधांकडे देखील वर्षा गायकवाड यांनी लक्ष वेधले. त्या म्हणाल्या की, दोन्ही पक्षांनी यापूर्वी देखील अनेक वेळा लोकसभा व विधानसभेच्या निवडणूका एकत्र लढवल्या आहेत. याबरोबरीने आरपीआयमधील काही गट देखील आमच्यात समाविष्ट होण्यासाठी इच्छूक आहेत. त्यामुळे सगळ्यांशी सल्लामसलत करुनच निर्णय घेणार आहोत. मनसेला कॉंग्रेसमधून विरोध आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व त्यानंतर होणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणूकांमध्ये महायुतीला टक्कर देण्यासाठी शरद पवार उद्धवसेना व मनसेला एकत्र आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे बोलले जात आहे. याबरोबरीने महाविकास आघाडीमध्ये मनसेला समील करुन घेण्यासाठी देखील शरद पवार उत्सुक असल्याचे बोलले जात आहेत. मात्र, कॉंग्रेसमध्ये परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. कॉंग्रेसमधील एक गट राज ठाकरेंच्या मनसेला सोबत घेण्यासाठी तीव्र विरोध करत आहेत. मनसेने उत्तर भारतीयांच्या विरोधात नेहमीच आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे कॉंग्रेसला उत्तर भारतीयांच्या व मुस्लीम मतपेढींमध्ये घट होण्याची भिती असल्याने, संबंधित गट मनसेसाठी नकारघंटा वाजवत आहेत. आघाडीसंदर्भात चर्चा झाली नाही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी, राष्ट्रवादी महापालिका निवडणुकांसाठी सर्व घटक पक्षांशी चर्चा करणार असल्याचे म्हटले होते. यासंदर्भात विचारणा करण्यात आली असता, गायकवाड म्हणाल्या की, आमची लढत ही भाजपविरुद्ध आहे. आम्ही एकट्याने लढण्याचा निर्णय कार्यकर्त्यांशी सल्लामसलत करुन घेतला असून त्यासंदर्भात आमच्या वरिष्ठांना या गोष्टीची कल्पना दिली आहे. राष्ट्रवादीकडून दिल्लीमध्ये कुणाशी चर्चा झाली याची माझ्याकडे माहिती नाही, मात्र इतर कोणत्याही पक्षाशी युती करण्यासंदर्भात आमची कोणतीही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.