Anura Kumara Dissanayake : श्रीलंकेच्या भूमीवरून भारतविरोधी कारवाया होणार नाहीत; श्रीलंकेचे अध्यक्ष दिसानायके यांची ग्वाही

नवी दिल्ली : श्रीलंकेच्या भूमीचा वापर भारतविरोधी कारवायांसाठी करू दिला जाणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही भारतभेटीवर आलेले श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली आहे. श्रीलंकेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याच्या पार्श्वभुमीवर ही हमी त्यांनी दिली आहे.
दिसानायके यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी व्यापक चर्चा केली. संरक्षण सहकार्य कराराबाबत लवकरच दोन्ही देशांमध्ये करार केला जाणार असून उर्जा विषयक संबंध अधिक दृढ करण्यासाठी पॉवर ग्रीड आणि पेट्रोलियम पाईपलाईन टाकण्याबाबतचा निर्णय देखील घेतला जाणार आहे. दोन्ही देशांच्या सुरक्षा विषयक हितसंबंध एकमेकांशी जोडलेले असून सुरक्षा सहकार्य कराराला लवकरात लवकर अंतिम रुप देणे गरजेचे असल्याचे दिसानायके यांनी पूर्ण सहमती दर्शवल्याचे मोदी यांनी सांगितले.
दोन वर्षांपुर्वी श्रीलंकेच्या आर्थिक हालाखीच्या परिस्थितीत भारताने ४ अब्ज डॉलरची मदत श्रीलंकेला केली होती. या मदतीबद्दल दिसानायके यांनी मोदी यांना धन्यवाद दिले. श्रीलंकेला दिलेल्या कर्जाची फेररचना करण्याबाबत दोन्ही देशांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. याशिवाय भौतिक, डिजीटल, उर्जा, संलग्नता, बहुउपयोगी पाइपलाइनबाबतही भागीदारीविषयी सखोल चर्चा झाली. मच्छिमारांबाबत मानवतावादी दृष्टिकोन टेवण्याची पंतप्रधानांची सूचना आणि तमिळ नागरिकांच्या हक्कांचे रक्षण व्हावे, अशी अपेक्षाही मोदींनी यावेळी केली.





