मुंबई : बिहार निवडणूकीची धामधुमी सुरु असताना कॉंग्रेसने महराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत आघाडी न करण्याचा निर्णय, मंगळवारी टिळक भवन येथे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वरिष्ठ कॉंग्रेसच्या नेत्यांनी घेतला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. कॉंग्रेस इंडिया आघाडीमध्ये सहभागी असलेल्या पक्षांसोबत आघाडी करण्यास उत्सुक आहे. मात्र मनसे हा पक्ष अजूनही इंडिया आघाडीमध्ये समाविष्ट नसल्याने ही युती केली जाणार नाही. हा निर्णय देखील लवकरच दिल्ली हायकमांडला कळविण्यात येणार आहे. काही काळापुर्वी मनसेने उत्तर भारतीय व अल्पसंख्यांक यांच्या विरोधात जोरादार मोहिम उघडली होती. त्यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी खळखट्याकचा मार्ग अवलंबला होता. त्यामुळे अशी आक्रमक व विरोधी भूमिका घेणाऱ्या मनसेसारख्या पक्षासोबत आघाडी करणे पक्षासाठी हानीकारक ठरू शकते तेही विशेषत: सध्या बिहार निवडणुकीची धामधुम सुरु असल्याने, ही आघाडी कॉंग्रेसने टाळली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अलीकडेच महाविकास आघाडीच्या सहकार्याने कथित मतदान हेराफेरी आणि पारदर्शकतेचा अभाव यासारख्या मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेतली असली तरी, काँग्रेसने हे अंतर राखण्याचा निर्णय घेतला आहे.